बापरे! ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत आढळले एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron

बापरे! ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत आढळले एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

व्हिएन्ना : युरोपमध्ये ओमिक्रॉनच्या (UK Omicron) संसर्गाची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याने ती रोखण्यासाठी आतापासून उपाययोजना करा, अशी विनंती जागतिक आरोग्य संघटनेने युरोपमधील देशांना केली आहे. ओमिक्रॉनचा आणखी काही देशांमध्ये पसरत असल्याचे ‘डब्लूएचओ’च्या युरोप विभागाचे संचालक डॉ. हान्स क्लुग यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दुसरीकडे आज ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1,06,122 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धास्ती वाढली आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग जगातील एकूण ९६ देशांमध्ये पसरला आहे. अनेक देशांनी कोरोना नियमांची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. क्लुग म्हणाले की,‘‘युरोप विभागातील ५३ देशांपैकी ३८ देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणू आढळून आला आहे. येत्या काही आठवड्यांत तो आणखी पसरण्याची शक्यता आहे. ब्रिटन, डेन्मार्क आणि पोर्तुगाल या देशांमध्ये या विषाणूचा प्रभाव वाढला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास संसर्गाची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याने ती रोखण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक आहे.’’ युरोपमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनामुळे २७ हजार जणांचा मृत्यू झाला. ओमिक्रॉनचा संसर्ग होणाऱ्यांचे प्रमाणही चाळीस टक्क्यांनी वाढले आहे.

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर

- जर्मनीमध्ये नाताळनंतर नियमांची कडक अंमलबजावणी होणार

- दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

- ब्रिटनमध्ये विलगीकरण आता १० ऐवजी सातच दिवस

याबाबत बोलताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटलंय की, परिस्थिती सुरळीत होण्याची चिन्हे असतानाच आपण सर्वांत भयानक संसर्गस्थितीच्या दिशेने जात आहोत. ओमिक्रॉनचा सर्वांनाच धोका आहे. इतर कोणत्याही विषाणूपेक्षा ओमिक्रॉनचा वेग प्रचंड आहे. जगातील प्रत्येक देशापर्यंत तो लवकरच पोहोचेल.