
दलित बाईच्या हातचं जेवण खाण्यास विद्यार्थ्यांचा नकार; पालकांकडूनही समर्थन
डेहराडून : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चंपावत जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी दलित महिलेने (Dalit woman) बनवलेले माध्यान्ह्य भोजन (midday meal) खाण्यावर बहिष्कार घातला. गेल्या आठवड्यात घडलेल्या निंदनीय या घटनेनंतर राज्यात सामाजिक भेदभाव व जातीसंबंधी पूर्वग्रह यावर वाद सुरू झाला आहे.
हेही वाचा: हे सरकार आपल्याच आमदारांबाबत असुरक्षित; फडणवीसांची सरकारवर टीका
सुखीढांग भागातील जौल गावातील सरकारी माध्यमिक शाळेत सुनीता देवी यांची नुकतीच भोजनमाता म्हणून नियुक्ती केली होती. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यन्ह्य भोजन बनविण्याची जबाबदारी त्यांच्यावर शाळा प्रशासनाने सोपविली होती. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता यांनी पहिल्या दिवशी तयार केलेले अन्न उच्च जातींमधील विद्यार्थ्यांनी खाल्ले होते. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी अन्नावर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली. एकूण ५७ विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जातीतील १६ विद्यार्थ्यांनी माध्यान्ह्य भोजन केले.
हेही वाचा: Goa निवडणुकीत TMC शर्यतीतही नाहीये, कशाला त्यांचा उल्लेख: केजरीवाल
पालकांकडून समर्थन
भोजन करण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांच्या पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवरच आरोप केले. शाळेत जेवण बनविण्यासाठी त्यांनी उच्च जातीमधील उमेदवाराची निवड जाणीवपूर्वक केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शाळेतील पालक -शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जोशी म्हणाले की, गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत आम्ही पुष्पा भट या महिलेची भोजनमाता म्हणून नियुक्ती केली होती. तिचा मुलगाही याच शाळेत शिकतो आणि ती गरजूही होती. पण मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष करीत दलित महिलेची निवड केली. शाळेत उच्च जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अशा जातींमधील महिलेचीच या पदावर नियुक्ती करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
सर्व सरकारी निकषांनुसार ही नियुक्ती केली होती. भोजनमाती पदासाठी ११ अर्ज आले होते. या महिन्यात झालेल्या पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या खुल्या बैठकीत सुनीता देवी यांची निवड केली होती. काही पालक विनाकारण वाद निर्माण करीत आहेत, असं मत जौल माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंह यांनी मांडलं आहे.
Web Title: Upper Caste Students Boycott Midday Meal Cooked By Dalit Woman In Uttarakhand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..