esakal | 'लशीपेक्षा कोरोनामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका जास्त'
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

'लशीपेक्षा कोरोनामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका जास्त'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लंडन - सध्या जगभरात एस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात अशा बातम्या आल्या होत्या. त्यावरून लस घ्यायची की नाही असा प्रश्न जगभरात निर्माण झाला आहे. त्यातच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधकांच्या टीमने याबाबत संशोधन केलं आहे. युकेमधील संशोधकांनी केलेल्या या संशोधनात अशा दावा केला आहे की, कोरोना लशीच्या तुलनेत कोरोनामुळे मेंदुत रक्ताच्या गाठी होण्याचा धोका जास्त असतो. संशोधकांची ही टीम ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या लशीवर संशोधन करणाऱ्या टीमपेक्षा वेगळी आहे.

एस्ट्राझेनका लसीमुळे दुर्मीळ अशा रक्ताच्या गाठी होत असल्याचं जर्मनीत पहिल्यांदा समोर आलं होतं. सेलेबल वेनस सायनस थ्रोबोसिस नावाच्या या दुर्मीळ अशा रक्ताच्या गुठळ्यांचे निदान जर्मनीत झाले होते. मार्चमध्ये Paul Ehrlich Institute ने सांगितलं होतं की, रक्ताच्या गुठळ्या या तरुणांमध्ये आणि मध्यम वयाच्या महिलांमध्ये समोर येत आहेत.

हेही वाचा: ''कोरोनाने धोकादायक रुप धारण केलंय''; WHO प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तात म्हटलं की, नव्या संशोधनानुसार कोरोनाच्या संसर्गामुळे सीव्हीएसटीचा धोका 8 ते 10 टक्के जास्त आहे. संशोधकांनी जवळपास 5 लाख लोकांवर संशोधन केलं. यातून असं आढळून आलं की, कोरोनाच्या संसर्गामुळे दर दहा लाख लोकांपैकी 39 जणांना सीव्हीएसटीचा धोका आहे. तर ब्रिटनच्या एजन्सीनं असं म्हटलं होतं की, एस्ट्राझेनकाच्या लशीमुळे हा धोका दहा लाख लोकांपैकी फक्त पाच जणांना आहे. जर्मनीत असा प्रकार समोर आल्यानंतर ब्रिटनच्या मेडिकल एजन्सीने म्हटलं होतं की, लशीमुळे धोक्याच्या तुलनेत होणारा फायदा जास्त आहे. अशा प्रकारे रक्ताच्या गुठळ्या होण्याने असलेला धोका खूपच कमी आहे आणि लोकांना लस देणं सुरु ठेवायला हवं असं स्पष्ट केलं होतं.

संशोधनानुसार सीव्हीएसटी झाल्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता ही जवळपास 20 टक्के इतकी आहे. मग यात रक्ताच्या गाठी या कोरोनामुळे किंवा लशीमुळे सुद्धा झालेल्या असु शकतात. संशोधकांनी ही बाबही सांगितली की, कोरोनाच्या संसर्गामुळे सीव्हीएसटीशिवाय इतर रक्ताच्या गाठी होण्याचा धोकाही जास्त असतो. सध्या व्हॅक्सिनमुळे होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्यांवर चर्चा होत आहे. मात्र कोरोना हाच रक्ताच्या गुठळ्यांसाठी मोठं कारण आहे.

हेही वाचा: कहर थांबेना! सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सननच्या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे म्हणणे आहे की, ते सध्या याची चौकशी करत आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एकच डोस दिला जात आहे. लसीकरणानंतर देशात 6 महिलांना रक्ताच्या गाठी झाल्याचा त्रास जाणवल्याचं समोर आलं आहे.