
Russia Ukraine War: झेलेन्स्की यांचा निर्धार ;आगामी वर्ष युक्रेनच्या विजयाचे असेल.युद्धाचा काळ वेदनादायी, साहसी आणि ऐक्याचा
किव्ह - २०२३ वर्ष विजयाचे वर्ष असेल आणि त्यासाठी सर्वशक्तीनिशी लढू, असा निर्धार आज युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केला.
रशियाच्या आक्रमणाला एक वर्ष झालेले असताना युद्धकाळातील दिवस अतिशय दु:खद असताना साहस दाखवणारेही होते, असेही ते म्हणाले.
अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करत म्हटले, की युक्रेनच्या नागरिकांनी स्वत:ला अजिंक्य असल्याचे दाखवून दिले आहे. २०२३ वर्ष हे आमच्या विजयाचे असेल. आज सकाळी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले,
की २४ फेब्रुवारी २०२२ पासून आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि कठिण काळ सुरू झाला. त्या दिवशी आम्ही सकाळी बॉम्बच्या धमाक्याने उठलो आणि तेव्हापासून जागेच आहोत. रशियाने म्हटले होते, की युक्रेनचा ७२ तास देखील निभाव लागणार नाही. पण आपण आजही निकाराने लढा देत आहोत.
आम्ही मागे हटलो नाही. हे आपल्या धाडसाचे, शौर्याचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. हजारो नागरिकांनी प्राण गमावले. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. युद्धाचे वर्ष क्लेषदायक, वेदनादायी होते, पण विश्वासाचे आणि ऐक्याचा अनुभव देणारेही होते.
आम्ही हार मानली नाही. युद्ध जिंकण्यासाठी सर्वकाही करू, असे झेलेन्स्की म्हणाले. युद्धाच्या पहिल्या दिवसांपासून संघर्ष करत आहोत. उद्या काय होणार, हे ठाऊक नव्हते. उद्यासाठी आपल्याला लढायचे आहे, हे सर्वांनाच समजत होते आणि लढलोही, असे ते म्हणाले.
आमच्यावर हल्ला झाला तेव्हा तो आयुष्यातील सर्वात मोठा कठीण दिवस होता. युक्रेनच्या आधुनिक इतिहासातील सर्वात खडतर काळ आहे, असे त्यांनी नमूद केले. युद्धग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही.
एक ना एक दिवस आपली जमीन परत मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, झेलेन्स्की यांनी आजच्या दिवसाची सुरवात लवकर केली. यादरम्यान, झेलेन्स्की यांनी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांशी संवाद साधला.