
Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त आमसभेत बैठक
न्यूयॉर्क : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणास २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. युद्धाच्या वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेची उच्चस्तरीय बैठक होणार त्यात सहभागी होऊन भाषण करण्याची इच्छा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे.
युक्रेनच्या वरिष्ठ उपपरराष्ट्र मंत्री एमाईन झापरोव्हा यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. आगामी काळात अनेक गोष्टी सुरळीत करावयाच्या आहेत, असे ‘असोसिएट प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या. युक्रेनच्या सैन्यदलाची स्थिती आणि रशिया फेब्रुवारीमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे, असा इशारा युक्रेनच्या गुप्तचर विभागाकडून मिळाला असल्याने झापारोव्हा यांनी भविष्यातील घडामोडींबद्दल सूतोवाच केले.
त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या अध्यक्षांना ‘यूएन’ला भेट द्यायची आहे, तेथे येण्याचा त्यांची इच्छा आहे, पण जर तेथे सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार असेल, तर त्यांना परवानगी मिळेल का हा प्रश्नच आहे.’’ जर झेलेन्स्की ‘यूएन’च्या मुख्यालयात आले तर युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनबाहेरील हा त्यांचा दुसरा दौरा असेल.
डिसेंबरमध्ये त्यांनी अमेरिका अचानक भेट देऊन त्यांचे प्रबळ समर्थक व अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली होती. युक्रेनला दिलेल्या सहकार्याबद्दल बायडेन आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील सदस्यांचे झेलेन्स्की यांनी त्यावेळी आभारही मानले होते. कठीण परिस्थितीतही युक्रेन ठामपणे उभा आहे, हेही त्यांनी अभिमानाने सांगितले होते.
युक्रेनचे ‘यूएन’मधील राजदूत सर्जी किसलीस्या म्हणाले, की आमसभेने २३ फेब्रुवारीला रशिया- युक्रेन युद्धावर उच्चस्तरीय चर्चेचे नियोजन यापूर्वीच केले आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सुरक्षा समितीची मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे. युद्धाच्या वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी आमसभेने दोनपैकी एक ठराव मंजूर करावा, अशी झेलेन्स्की यांची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हावी, असे युक्रेनला वाटत आहे, असे झापरोव्ह म्हणाल्या.
दोन मुद्द्यांवर युक्रेन त्याच्या भागीदार देशांची चर्चा करीत आहे. यातील एक म्हणजे अध्यक्षांच्या दशसूत्री शांतता मोहिमेला पाठिंबा देण्याबद्दल आहे. युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेची पुनर्स्थापना करणे आणि रशियन फौजांना माघार तसेच आक्रमणाच्या गुन्ह्यांवर खटला चालवण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.
किव्हच्या इमारतीवर हल्ला
किव्हमध्ये शनिवारी सकाळी स्फोटांचे आवाज ऐकू आले. शहरातील महत्त्वाच्या इमारतीवर रशियाने आज क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो तिमाशिको यांनी दिली. किव्हच्या डाव्या किनाऱ्यावरील निप्रोव्हस्की जिल्ह्यात स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचे महापौर व्हिताली क्लिश्क म्हणाले.
नव्या वर्षात आतापर्यंत किव्हवर एकही हल्ला झाला नव्हता. या हल्ल्यानंतर राजधानीत हल्ल्यांचे भोंगे वाजण्यास सुरुवात झाली. नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. किव्हमधील इमारतींना लक्ष्य करण्यात आले की एकावर हल्ला झाला याची माहिती मिळालेली नव्हती.
आम्हाला विचारपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. पहिले काय असेल, सवाल अजूनही आहे. पुढील एक किंवा दोन आठवड्यात आपल्याला त्याबद्दल माहिती मिळेल, असा विश्वास मला आहे.’’
- एमाईन झापरोव्हा, वरिष्ठ उपपरराष्ट्र मंत्री, युक्रेन