नंदनवनावर वक्रदृष्टी, UN च्या अहवालाने काश्मीच्या प्रश्नावर बोट

यूएनचा अहवाल: अल कायदाची भारतावर नजर
javahiri
javahiriSakal

न्यूयॉर्क - अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील शाखेने त्यांच्या नियतकालिकाच्या नावात बदल केला असून त्यावरून त्यांनी त्यांचे लक्ष अफगाणिस्तानकडून काश्‍मीरकडे वळविले असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. इसिस आणि तालिबानचा प्रभाव वाढलेल्या अल कायदाकडे अद्यापही १८० ते ४०० दहशतवादी असल्याचेही अहवालात सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनांबाबतची माहिती असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. अल कायदा -भारतीय उपखंड (एक्यूआयएस) ही संघटना मूळ अल कायदा संघटनेच्या नेतृत्वाखालीच काम करते. त्यांचा अफगाणिस्तानमध्ये फारसा प्रभाव नसला तरी चारशेच्या आसपास असलेले त्यांचे सदस्य विविध कारवाया करत असतात. या संघटनेत भारत, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान या देशांतील युवकांची दिशाभूल करून भरती करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या कारवाईनंतर २०१५ पासून ही संघटना कमकुवत झाली असल्याने त्यांनी आता आपले लक्ष काश्‍मीरकडे वळविले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. ‘नवा ए अफगाण जिहाद’ हे त्यांच्या नियतकालिकाचे नाव बदलून त्यांनी ते आता ‘नवा ए गझवा ए हिंद’ असे केभे आहे. ‘एक्यूआयएस’ने केवळ नावात बदल केला नाही, तर नियतकालिकामधून आपले उद्दीष्टही स्पष्ट केले आहे. एप्रिल २०१९ मध्ये अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी याने काश्‍मीरमध्ये जिहाद पुकारण्याची घोषणा केली होती. त्याची आठवण ‘नवा ए गझवा ए हिंद’मधून करून देण्यात आली आहे.

तस्करीतही वाढ

अफगाणिस्तानमध्ये उत्पादन झालेल्या अमलीपदार्थांची भारतात तस्करी होण्याचे प्रमाणही वाढल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी तीन टन हेरॉइन जप्त केले होते. हे सर्व अफगाणिस्तानमधून आले होते. भारतातच नव्हे, तर तालिबान सत्तेत आल्यापासून इराणमार्गे तुर्कस्तान आणि युरोपमध्येही अमलीपदार्थांच्या तस्करीचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे.

जवाहिरी अफगाणिस्तानातच

अल कायदाचा म्होरक्या आयमान महंमद रबी अल जवाहिरी हा सध्या अफगाणिस्तानातच असून तालिबानकडे देशाची सूत्रे आल्यापासून तो पाकिस्तानला लागून असलेल्या भागात अधिक सक्रीय झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून अल जवाहिरीने आठ व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी एकामध्ये त्याने भारतातील हिजाब वादाचाही उल्लेख केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com