अपंग चेंगचा घरात दुर्दैवी अंत

वृत्तसंस्था
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

चेंग बोलू, चालू शकत नव्हता
आपल्या मुलाला सेरेब्रल पाल्सीचा आजार असून, तो व्हीलचेअरला खिळलेला आहे. तो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. तो बोलू शकत नाही, चालू शकत नाही, तसेच त्याला स्वतःच्या हाताने अन्न सेवनही करता येत नाही. चेंगच्या आईचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे माझ्या मुलाची काळजी घ्या, अशी कळकळीची विनंती चेंगच्या वडिलांनी विशेष कक्षात जाण्यापूर्वी केली होती.

बीजिंग - कोरोना व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, त्या पार्श्‍वभूमीवर एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे विशेष कक्षात हलविण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या सेरेब्रल पाल्सीमुळे अपंगत्व आलेल्या मुलाचा घरात मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. घरात काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने ही घटना घडल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यान चेंग असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून, तो १७ वर्षांचा होता. त्याचे वडील यान झिआओवेन यांना ताप आल्यानंतर त्यांना २२ जानेवारी रोजी विशेष कक्षात हलविण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष कक्षात हलविण्यापूर्वी ‘आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नाही, त्यामुळे गावातील नातेवाईक, स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुलाची काळजी घ्यावी’, अशी विनंती झिआओवेन यांनी केली होती. विशेष कक्षात दाखल झाल्यानंतरही झिआओवेन यांनी माझ्या घरी जाऊन चेंगची काळजी घेण्याची विनंती करणारी पोस्ट सोशल मीडियात प्रसिद्ध केली होती.   

व्हिडिओ पाहून डोळ्यात येतं फक्त पाणीच...

घरात एकटाच असलेला चेंगचा २९ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याचे होंगान विभागाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. चेंगच्या मृत्यूला जबाबदार धरत स्थानिक प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हाकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. 

चेंगचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. चेंगच्या मृत्यूची बातमी ऐकून अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला. चीनमधील ‘वेईबो’ या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चेंगच्या मृत्यूच्या बातमीसंदर्भातील हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The unfortunate end of the disabled Chengs house