आणखी अकरा चीनी कंपन्यांना बडगा; उइगर मुद्द्यावरून अमेरिकेने केले ब्लॅकलिस्ट 

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना प्रमाणाबाहेर ताणली आहे. त्यांनी निर्यात निर्बंध उपायांचा गैरवापर केला आहे. आंतरराष्ट्रीय संबंध राखण्याच्या मूलभूत निकषांचाही हा भंग आहे.

वॉशिंग्टन - आर्थिकदृष्ट्या काळ्या यादीतील चीनच्या कंपन्यांमध्ये अमेरिकेने आणखी भर टाकली. यात 11 कंपन्यांचा समावेश करण्यात आला. नानचँगमधील ओ-फिल्म टेक या अॅपल आय-फोन पुरवठादाराचाही समावेश आहे. 

अमेरिकी वाणिज्य खात्याने ही कारवाई केली आहे. पश्चिम चीनमधील शीनजियांग प्रांतातील उइगरांचा छळ केला जातो. त्यांना व इतर अल्पसंख्य मुस्लीम गटांना सक्तीने मजुरी करण्यास भाग पाडले जाते. तेथे असंख्य कापड गिरण्या आहेत. या वंशाच्या नागरिकांवर आणखी दडपशाही करता यावी म्हणून आनुवंशिक पृथःकरण केले जाते. ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे असे सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काळ्या यादीतील समावेशामुळे या कंपन्या अमेरिकी सरकारच्या मंजुरीशिवाय अमेरिकी कंपन्यांकडून सुटे भाग विकत घेऊ शकणार नाहीत. 

चीनी वकिलातीचा इन्कार  
ही यादी जाहीर झाल्यानंतर अमेरिकेतील चीनी वकिलातीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. मे महिन्यातील कारवाईनंतर मात्र तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली होती. तेव्हा सांगण्यात आले होते की, हा चीनच्या अंतर्गत व्यवहारांमधील हस्तक्षेप आहे. अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना प्रमाणाबाहेर ताणली आहे. त्यांनी निर्यात निर्बंध उपायांचा गैरवापर केला आहे. आंतरराष्ट्रीय संबंध राखण्याच्या मूलभूत निकषांचाही हा भंग आहे. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीचे परिणाम उत्साहवर्धक

महत्त्वाचे मुद्दे 
- ट्रम्प प्रशासनाकडून काळ्या यादीचा तिसरा टप्पा जाहीर 
- आधीच्या दोन टप्यांत 37 कंपन्यांवर कारवाई 
- नानचँग ओ-फिल्म टेक या कंपनीकडून अॅपलचे मुख्य कार्यवाह टीम कुक यांना डिसेंबर 2017 पाहुणचार 
- ही कंपनी अॅमेझॉन व मायक्रोसॉफ्टचीही पुरवठादार 
- बीजिंग जिनॉमिक्स संस्थेशी संलग्न दोन कंपन्या 
- केटीके ग्रुप (हायस्पीड रेल्वे बनविण्यासाठी लागणाऱ्या दोन हजारहून जास्त भागांचे उत्पादन, ज्यात इलेक्ट्रॉनिक्सपासून सीटपर्यंत विविध वस्तू) 
- तानयुआन टेक्नॉलॉजी (उच्च क्षमतेच्या औष्णिक प्रवाहकीय ग्रॅफाईटने प्रबलित केलेल्या अॅल्युमिनियीम संयुगाची जुळवाजुळव) 
- चँगजी इस्क्वेल टेक्स्टाईल (इस्क्वेल समूहाकडून 2009 मध्ये सुरु झालेली कंपनी. हा समूह राल्फ लॉरेन, टॉमी हिलफीगर व ह्युगो बॉस अशा आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कपड्यांचे उत्पादन) 
- हेटीयन हाओलीन हेअर अॅक्सेसरीज (अमेरिकेच्या सीमाशुल्क व सीमा संरक्षण विभागाकडून एक जुलै रोजी न्यू जर्सीतील नेवार्कमध्ये एका जहाजावरून आठ लाख डॉलर किमतीचा 13 टन केशविषयक माल जप्त, मानवी केस शीनजियांग प्रांतातील नागरिकांचे असल्याचे कारण) 
- हिकव्हिजन (व्हिडिओ सर्व्हेलन्स), सेन्सटाईम ग्रुप (चेहऱ्यावरून संरक्षणात्मक तंत्रज्ञान निर्मिती), मेगवी टेक्नॉलॉजी अशा कंपन्यांसह सार्वजनिक सुरक्षा क्षेत्रातील 20 कंपन्यांवर यापूर्वी कारवाई 

चीनचा होकार नकाराबरोबरीचाच; सकारात्मक चर्चेनंतरही सीमारेषेवरील कुरापती सुरुच

सक्तीने मजुरीला जुंपणे, जनुकीय नमुने गोळा करण्यासाठी छळाचा अवलंब अशा सदोष मार्गांनी चीन सरकार नागरिकांवर अत्याचार करते. या मार्गांना सक्रियतेने चालना दिली जाते. 
- विल्बर रॉस, अमेरिकी वाणिज्य मंत्री 

बीजिंग जिनॉमीक्स संस्थेशी चीन सरकारची भागीदारी आहे. मानवतावादाच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाशी आम्ही तंत्रज्ञान क्षेत्रात हातमिळवणी करू इच्छित नाही. 
- मार्को रुबीओ, रिपब्लिकन सिनेटर 

इस्क्वेल समुहाचे प्रयत्न 
दरम्यान, इस्क्वेल समुहाचे मुख्य कार्यवाह जॉन चेन यांनी सोमवारी वाणिज्य मंत्री रॉस यांना पत्र पाठवून काळ्या यादीतून वगळण्याची विनंती केली. आपला समूह सक्तीने मजुरी करायला लावत नाही. तसे कधीही करणार नाही. यास आमचा पूर्णपणे ठाम विरोध आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United States has listed 11 Chinese companies as economically blacklisted