
Putin Girlfriend Blacklisted : अमेरिकेने केलं पुतिनच्या गर्लफ्रेंडला ब्लॅकलिस्ट, गर्भवती असल्याची चर्चा
Putin Girlfriend Blacklisted : युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पुतिन यांची कथित मैत्रीण अलिना माराटोव्हना काबाएवा हिला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले असून, अमेरिकेने अलिनाचा व्हिसा रद्द केला आहे. 39 वर्षीय काबाएवाचे पुतिन यांच्याशी जवळचे संबंध आहेत. काबाएवा रशियन संसदेच्या ड्यूमाच्या माजी सदस्या आणि नॅशनल मीडिया ग्रुपची सध्या प्रमुख आहे. हा गट टेलिव्हिजन, रेडिओ आणि प्रिंट मीडिया संस्थांचा रशियन समर्थक गट आहे.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, युरोपियन युनियन आणि ब्रिटननेही काबाएवावर निर्बंध लादले आहेत. वरिष्ठ नेता, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि रशियन फेडरेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य असल्याच्या आधारावर काबाएवावर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशिया, पुतिन यांच्यासह त्यांच्या दोन मुली आणि इतर अनेक रशियन नेत्यांवर निर्बंध लादले आहेत. या नेत्यांवर प्रवास निर्बंधांसोबतच त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. काबाएवावर बंदी घालण्यापूर्वी अमेरिकेने पुतिन यांच्या दोन्ही मुली कॅटरिना व्लादिमिरोवना तिखोनोवा आणि मारिया व्लादिमिरोवना वोरोंत्सोवा यांच्यावर निर्बंध लादले होते.
हेही वाचा: अल जवाहिरीच्या खात्म्यानंतर अमेरिकेला भीतीने पछाडले, जारी केला अलर्ट
अमेरिकेच्या ट्रेझरी मंत्रालयाने आतापर्यंत 893 रशियन नेते आणि अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे. त्यात रशियाचे सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असून, या सर्वांचे व्हिसा जप्त करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन पुन्हा एकदा वडील होणार असल्याची चर्चा असून, असा दावा केला जात आहे की, पुतिन आणि अलिना यांना आधीच दोन मुले आहेत आणि आता पुन्हा अलिना एका बाळाला जन्म देणार आहे.
Web Title: Us Blacklists Putin Rumoured Girlfriend In Latest Round Of Sanctions
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..