US Election 2020: बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदावर चुकीचा दावा करु नये- डोनाल्ड ट्रम्प

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

हा दावा मी ही करु शकतो. आता कायदेशीर कारवाई सुरु होत आहे, असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे. 

वॉशिंग्टन US President Election 2020- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे शुक्रवारी महत्त्वाची राज्ये जॉर्जिया आणि पेन्सिलव्हेनियामध्ये आपले प्रतिस्पर्धी तथा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे गेले आहेत. ते विजयाच्या अगदी नजीक पोहोचले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी चुकीचा दावा करु नये. हा दावा मी ही करु शकतो. आता कायदेशीर कारवाई सुरु होत आहे, असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे. 

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार पथकाने पराभव निश्चित असल्याचे पाहताच एक निवेदन जारी करुन बायडन यांच्या संभाव्य विजयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले. बायडन यांचा विजयाचा दावा चुकीचा आहे आणि निवडणुकीतील शर्यत अजून संपलेली नाही, असे ट्रम्प यांच्या प्रचार पथकाचे जनरल कौन्सिल मॅट मार्गन यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल आता कायदेशीर लढाईत अडकलेला दिसत आहे.

अजून काही ठिकाणी मतमोजणी होणे बाकी आहे. तत्पूर्वी 'सीएनएन' आणि 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, बायडन हे ट्रम्प यांच्यापेक्षा 5500 हून अधिक मतांनी पुढे आहेत. बायडन यांच्याके सध्या 253 इलेक्टोरल मते आहेत. तर व्हाइट हाऊसमध्ये जाण्यासाठी 270 हा जादुई आकडा आहे. 

हेही वाचा- अमित शहा यांनी चुकीच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्याने नवा वाद निर्माण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election 2020 President donald trump tweeted biden should not make a wrong claim to presidency