US Election - ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या; मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

लाखोंच्या संख्येने टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिकांमध्ये गडबड होत असल्याचे सांगत ट्रम्प यांनी चार राज्यांत न्यायालयीन लढाई सुरु केली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागे पडले आहेत. यानंतर मतमोजणीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्रा त्यांचा हा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी केलेला आरोप वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचे निवडणूक निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा कोणताही पुरावा नसून असे प्रकार झालेले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगत ट्रम्प यांचा आरोप फेटाळून लावला. 

लाखोंच्या संख्येने टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिकांमध्ये गडबड होत असल्याचे सांगत ट्रम्प यांनी चार राज्यांत न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. मात्र, ‘ट्रम्प यांचे आरोप आश्‍चर्यजनक आहेत. अमेरिकेत अनेक वर्षांची मतमोजणी प्रक्रिया असून यात कधीही गैरप्रकार झालेला नाही,’ असे जर्मनीहून निरीक्षक म्हणून आलेले तेथील खासदार मायकेल लिंक यांनी सांगितले.

हे वाचा - US Election 2020: पराभव झाला तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिका सोडणार का ?

पोर्टलँडमध्ये दंगल जाहीर
ट्रम्प समर्थक आणि बायडेन समर्थक समोर येऊन गोंधळ झाल्याने येथील ओरेगॉनमधील पोर्टलँड प्रशासनाने दंगल जाहीर करत पोलिसांना पाचारण केले आहे. मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी ‘मतमोजणी थांबवा’, ‘प्रत्येक मत मोजा’ अशा घोषणा दिल्याने वातावरण तापले. यानंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊन त्यांनी आजूबाजूंच्या घरांवर, दुकानांवर दगडफेक सुरु केली. यामुळे प्रशासनाने दंगल जाहीर केली.

हे वाचा - US Election 2020: ट्रम्प मारू शकतात बाजी; मोठी आघाडी असूनही बायडेन यांच्यासमोर आव्हान

तर ट्रम्प १९९२ नंतर पहिलेच अध्यक्ष...
विद्यमान अध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूकीत पराभूत झाले तर दुसऱ्या कार्यकालासाठीचा प्रयत्न फसलेले ते १९९२ नंतरचे पहिले विद्यमान अध्यक्ष असतील. १९८८ मध्ये सत्तेवर आलेले रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज एच. डब्लू. बुश यांना १९९२ च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिल क्लिंटन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर बिल क्लिंटन (१९९२ ते २०००), जॉर्ज डब्लू बुश (२००० ते २००८) आणि बराक ओबामा (२००८ ते २०१६) या तिन्ही अध्यक्षांनी दोन कार्यकाल पूर्ण केले. अमेरिकेच्या घटनेप्रमाणे एका व्यक्तीला तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election 2020 trumps allegations in vote harm public are baseless says osce observbers