US Election: अमेरिकेच्या इतिहासाला कलाटणी देणारी निवडणूक

विजय नाईक
Sunday, 8 November 2020

7 नोव्हेबर हा अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस मानला जाईल

नवी दिली- हा ब्लाग लिहिताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमाक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन व उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड झाल्याची घोषणा झाली. 7 नोव्हेबर हा अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस मानला जाईल. कारण, या निवडणुकीने पहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष निवडली असून, त्या भारतीय वंशाच्या असल्याने भारतासाठी एक गौरवास्पद बाब ठरणार आहे. बायडन यांना 273 प्रातिनिधिक मते मिळाली. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रातिनिधिक मते 213 पुढे गेली नाहीत. डेलावेअर मधील विल्मिंगटन येथून केलेल्या आभार प्रदशर्नाच्या भाषणात दुभंगलेल्या अमेरिकेचे एक्य कायम ठेवण्याचा निर्धार बायडन यांनी व्यक्त केला. बायडन जिंकल्याची घोषणा झाल्यावरही  ट्रम्प यांनी त्यांचे  तत्काळ अभिनंदन केले नाही. यावरून त्यांचा अडमुठेपणा व तिरस्कार दिसून येतो.   

नेवाडा, जार्जिया व पेनसिल्वानिया या कळीच्या राज्यातून बायडन आघाडीवर असल्याचे दिसताच, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून रडीचा डाव सुरू केला. चोराच्या उलट्या, या म्हणी प्रमाणे त्यांनी खोटेपणचा उच्चांक गाठला. द फॅक्ट चेकर डाटाबेटनुसार, ट्रम्प यांनी गेल्या 827 दिवसात तब्बल दहा हजार खोटे व दिशाभूल करणारे दावे केले. ज्या राज्यात बायडेन व  कमला हॅरिस यांना अधिक मते मिळत आहेत, तेथील मतमोजणी थांबवा, अशी मागणी करीत  मीच जिंकलोय, असा दावा व्हाइट हाऊसमधील दोन भाषणात केलाच, परंतु, बायडन हे अमेरिकेतील निवडणूक चोरत आहेत, असाही खुद्द त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील नेत्यांना न पटणारा मुद्दा वारंवार मांडला. कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून जाणार नाही, असा संकेत दिल्याने अमेरिकेच्या खांद्यावर वेताळ बसल्याची जाणीव तेथील विचारवंत व कोट्यावधी लोकांना झाली. त्यांच्या दाव्याबाबत जगात आश्चर्य व उद्विग्नता व्यक्त होत आहे. काही वर्षापूर्वी बिहारच्या निवडणुकात होणारी दादागिरी थेट अमेरिकेत जाऊन पोहचली, असे म्हटल्यास चूक ठरू नये.

US election: ज्यो बायडन यांच्याबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी

मतमोजणी होत असताना बायडन व हॅरिस यांच्याविरूद्ध ट्रम्प समर्थकांना चिथावित होते. त्यांच्या समर्थकांनी बंदुका, पिस्तुले घेऊन अऩेक मतदान केंद्रांना वेढा घालून धाकदपटशा चालविली होती. अमेरिकेतून येणाऱ्या बातम्यातून या केंद्रातील अधिकारी भयभीत झाले होते, तरीही कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी केला व प्रक्रिया चालू ठेवली. हारणार असे दिसताच, ट्रम्प यांनी मतमोजणी प्रकिया फ्राड आहे, असा कांगावा करीत न्यायालयात तीन न्यायालयात खटलेही भरले, परंतु त्यातील दोन न्यायालयांनी ते निकालात काढून त्यांचे दावे बरखास्त केले. ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची धमकी दिली. ती प्रत्यक्षात उतरेल की नाही, हे येत्या काही दिवसात दिसेल. 

तथापि, लेमडक अध्यक्ष म्हणून ट्रम्प हे 20 जानेवारी 2021 च्या दुपारी तीन वाजेपर्यंत त्या पदावर राहाणार असल्याने पुढील 73 दिवसात ते काय पावले टाकतील, किंवा कोणत्या थराला जातील याचा अंदाज करता येणार नाही. याबाबत गेल्या आठवड्यात अमेरिकेत माध्यमे व अऩ्य विचारगटातून जोरदार चर्चा चालू होती. त्यात एक टोकाचा प्रश्न विचारण्यात आला, की 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिला, तर काय पेच निर्माण होईल. याचे उत्तर देताना व्हाईट हाऊसचे माजी संपर्क संचालक अँथनी स्कारामुसी यांनी सांगितले, की असे झाल्यास व्हाईट हाऊसमधील सिक्रेट सर्व्हिस त्यांची उचलबांगडी करुन त्यांना पेनस्लिव्हानिया एवेन्यू घेऊन जातील व तेथे सोडून येतील. 

हा ड्रामा ट्रम्प करणार काय. त्यांच्या आतापर्यंतच्या वागणुकीतून ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. दुसरे म्हणजे, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात नऊ पैकी त्यांना पाठिंबा देणारे सहा न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडे त्यांनी धाव घेतल्यास ते काय निकाल देतील, असा प्रश्न विचारला जातो. आणखी एक शक्यता म्हणजे ट्रम्प यांनी मतदानात गैरव्यवहार झाल्याच्या कारणावरून येत्या काही दिवसात अमेरिकेत अस्थिरता पसरवून आणिबाणी जाहीर केल्यास काय घटनात्मक पेच निर्माण होईल. अर्थात, हे सारे जर-तरच्या संभाव्यतेचे प्रश्न आहेत. बायडन व हॅरिस यांच्या यशाने डेमाक्रॅटिक पक्ष व अमेरिकेत पसरलेले उत्साहाचे वातावरण पाहता, कोणतीही अतिरेकी भूमिका घेण्यापूर्वी ट्रम्प यांना विचार करावा लागेल. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत अमेरिकेचे राजकारण ते ट्विटरच्या माध्यमातून चालवित होते. प्रचार करताना त्यांनी कमला हॅरिस या मान्स्टर आहेत, असा आरोप केला, तर बायडन हे 77 वर्षांचे असल्याने तब्येतीचे कारण सांगून काही महिन्यातच ते अध्यक्षपदाची सूत्रे हॅरिस यांच्या हाती देतील, असेही सांगून टाकले.   

बायडन व हॅरिस यांना एक गोष्ट नाकारून चालणार नाही, की ट्रम्प यांना निवडणुकीत 70 दशलक्ष मते मिळाली आहेत. तर बायडन यांना 74 दशलक्ष मते मिळाली. त्यामुळे अमेरिकेतील दुभंगलेल्या मानसातून समरसता कशी आणायची , हे मोठे आव्हान या दोघांपुढे असेल. बायडन व हॅरिस जिंकले तर ...  या 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ब्लागमध्ये  मी त्यांचे संभाव्य धोरण विशद केले होते. या निवडणुकीतील यशापयाकडे पाहता, अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हमध्ये (काँग्रेस) डेमाक्रॅटिक पक्षाला बहुमत असून, त्यांच्या प्रतिनिधींची संख्या 212 व रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधिंची 198, अशी आकडेवारी असून, सिनेटमध्ये आजही रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यांची संख्या 53, तर डेमाक्रॅट्सची संख्या 45 आहे. उरलेल्या दोन अपक्षांचा डेमाक्रॅटिक पक्षाला पाठिंबा आहे. याचा अर्थ ट्रम्प यांनी सम्मत केलेले निर्णय व विधेयके बरखास्त करताना अथवा फिरविताना बायडेन यांना सिनेटमध्ये विरोध होण्याची शक्यता टाळता येणार नाही. परंतु, रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमधील मेजारिटी लीडर मिच मॅकानेल यांच्याबरोबर बायडेन यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याने त्यांचे मन बायडेन वळवू शकतील, असे बोलले जाते. हाऊस ऑफ रिप्रेझन्टेटीव्हमधील प्रमुख रिपब्लिकन नेते केव्हिन म्याकारर्थी यांच्याबरोबरही बायडेन यांना जवळीक साधावी लागेल.

US Election: आईच्या आठवणीने गहिवरल्या कमला हॅरिस

आणखी एक बाब म्हणजे, ट्रम्प यांचा पक्षावरील पगडा कमी होण्याची शक्यता नाही. त्यांच्या इतका प्रभावी नेता पक्षात नाही. किंवा त्यांचे नेतृत्व झुगारून देण्याइतका गटही पक्षात तयार झालेला नाही. ट्रम्प यांच्यापुढे आव्हान आहे, ते त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सत्तेच्या दुरूपयोगाचे व त्यातून बाहेर येणाऱ्या संभाव्य आर्थिक कुलंगड्यांचे. अध्यक्ष असूनही आयकर न भरणारा राष्ट्राध्यक्ष म्हणून ते सर्वांना ठाऊक आहेत. त्यामुळे, त्याबाबतही अधिक माहिती प्रकाशात येऊ शकते. 

दरम्यान बायडन यांच्या प्राधान्यांकडे पाहायचे असेल, तर त्यांच्या भाषणाकडे वळावे लागेल. पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकन जनतेला एक्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ते प्रत्येकाचे मन वऴविणार आहेत. आय साट धिस ऑफिस टू रेस्टोअर सोल ऑफ अमेरिका. मध्यमवर्ग हा देशाचा कणा असून, तो मजबूत करणार आहे. जगात गमविलेला अमेरिकेचा आदर पुन्हा प्राप्त करावयाचा आहे. देशाची सेवा मी फँनट्यास्टिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना बरोबर घेऊन करणार आहे. कमला तुम्ही आता ऑनररी बायडन झाल्या आहात. ट्रम्प व रिपब्लिकन पक्षाला उद्देशून ते म्हणाले की आपण एकमेकांचे शत्रू नव्हे, तर सारे अमेरिकन आहोत. अमेरिकेच्या जखमा भरून काढण्याची ही वेळ आहे. बायडेन यांनी विशेषतः आफ्रिकन अमेरिकन लोकांचे मनापासून आभार मानले. करोना काबूत आणण्याची लढाई चालू ठेवण्यासाठी उद्या ते बायडेन-हॅरिस कोविद योजना जाहीर करणार आहेत. 20 जानेवारी 2021 रोजी अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल.   

ट्रम्प व मोदी यांची मैत्री घनिष्ट होती. परस्परांच्या देशातील जनतेत लोकप्रिय होण्यासाठी दोघांनी एकमेकाला गेल्या चार वर्षात बरीच मदत केली. त्याचा भारताला लाभ झाला. रिपब्लिकन अध्यक्ष भारताला नेहमीच धार्जिणे ठरलेत. तथापि, डेमाक्रॅटिक अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळातही दुतर्फा संबंधांचा आलेख चढता राहिला. ऑक्टोबर 2014 मध्ये तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोदी यांच्या अमेरिकेच्या भेटीत त्यांना खास भोजनासाठी आमंत्रित करून भारतीय लोकशाहीबाबत प्रशंसोद्गार काढले होते. त्या भेटीतील मैत्रीला पुन्हा जागे करावे लागेल. ते करताना अर्थातच कमला हॅरिस यांचे साह्य भारताला मिळणार आहे. सारांश, भारत-अमेरिका संबंध बाडयन-हॅरिस यांच्या कार्यकालात सलोख्याचेच राहतील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US election that changed the course of American history article by vijay naik