US Election: आईच्या आठवणीने गहिवरल्या कमला हॅरिस

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत.

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यामध्ये डेमोक्रॅटिकचा पक्षाचा विजय झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन हे राष्ट्रध्यक्षपदाचे तर कमला हॅरिस या उपराष्ट्रपदाच्या उमेदवार होत्या. कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांची आई श्यामला गोपालन हरिस या 19 व्या वर्षी भारतातील चेन्नईमधून अमेरिकेत राहायला गेल्या होत्या.

विजयी झाल्यानंतर हॅरिस बोलताना म्हणाल्या," माझी आई 19 व्या वर्षी अमेरिकेत राहायला आली त्यावेळी तिने आपली मुलगी या पदापर्यंत जाईल असा विचारही केला नव्हता. पण तिचा विश्वास होता की, इथं कष्ट केल्यावर या गोष्टी शक्य आहेत." तसेच हॅरिस यांनी त्यांच्या आईची आठवण येत असल्याचेही सांगितले. श्यामला गोपालन हॅरिस या एक प्रसिध्द शास्त्रज्ञ होत्या. 

'मी लोकांना तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी काम करणार'

कोण आहेत कमला हॅरिस?
कमला या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. शिवाय त्या भारतीय वंशाच्या आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. 55 वर्षांच्या कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियामधील ओकलंडचा आहे. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित होऊन अमेरिकेत आलेले आहेत. आईचा शामला यांचा जन्म भारतातला आहे आणि वडिलांचा अफ्रिकेतील जमैकातला. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे आईवडील विभक्त झाल्याने नंतर कमला आणि त्यांची बहिण माया यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला.

US President Election: मीच जिंकलो ! डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही पराभव अमान्य

भारताशी असलेलं नातं
कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला आहे. आईसोबत त्या भारतातही येत असत. आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या अभिमानाने सांगतात. अमेरिकेतल्या भारतीयांना कमला या त्यांच्यापैकीच एक यासाठी वाटतात. 2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election kamala harris greatful to mother Shyamala Gopalan Harris