"राष्ट्रपती झालो, तर सीमेवरील सर्व धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतासोबत खंबीरपणे उभा असेन"

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

अमेरिकेतील (America) राष्ट्रपतीपदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील (America) राष्ट्रपतीपदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर आम्ही निवडणुका जिंकलो तर आमचे सरकार भारताला भेडसावणाऱ्या सर्व  धोक्यांचा सामाना करण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिन, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत भाष्य केलं आहे.

बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडेन यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय-अमेरिकी समुदायाला संबोधित केले. मी 15 वर्षांपूर्वी भारतासोबत ऐतिहासिक आण्विक कराराला मंजुरी देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या गटाचे नेतृत्व केले आहे. भारत आणि अमेरिका जवळचे मित्र आणि भागीदार झाले तर जग अधिक सुरक्षित होईल, असं जो बायडेन यावेळी म्हणाले. 

फेसबुक पडलं तोंडावर; भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या

जर आमचा निवडणुकीमध्ये विजय झाला, तर भारत आपल्या क्षेत्रात आणि सीमाभागात ज्या धोक्यांचा सामना करत आहे, त्यांना सोडवण्यासाठी आम्ही भारतासोबत उभे राहू. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार वाढवण्यासाठी, हवामान बदल आणि जागतिक आरोग्य समस्येसारख्या वैश्विक आव्हानांना निकालात काढण्यासाठी आम्ही काम करु. माझी राष्ट्रपतीपदी निवड झाली तर लोकशाहीची तत्वे मजबूत करण्यासाठी काम केले जाईल, ज्यांची ताकद विविधता आहे. उभय देश आणि देशातील नागरिकांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करु, असं बायडेन म्हणाले.

मी राष्ट्रपतीच्या नाते भारतीय-अमेरिकी समुदायावर विश्वास ठेवणे सुरुच ठेवेन. हा समुदाय दोन्ही देशांना जोडून ठेवतो. माझा मतदारसंघ डेलावेयर येथे आणि सिनेटमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय-अमेरिकी लोक राहतात. बराक ओबामा यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात त्यांच्या सरकारमध्ये अन्य कोणत्याही सरकारच्या तुलनेत अधिक भारतीय-अमेरिकी होते. आमच्याही सरकारमध्ये या समुदायाचे प्रतिनिधित्व अधिक असेल. या मोहिमेत आपल्यासोबत प्रिय मित्र कमला हॅरिस आहेत. त्या अमेरिकेच्या इतिहासातिल पहिल्या भारतीय-अमेरिकी उपराष्ट्रपती असतील, असं बायडेन म्हणाले. 

महेंद्र सिंह धोनीचं क्रिकेटमधील योगदान प्रेरणादायी : शरद पवार

आपल्या सगळ्यांना माहित आहे की कमला हॅरिस या बुद्धिमान आहेत. त्या पूर्णपणे तयार आहे. पण त्यांची अन्य एक गोष्ट आपल्याला प्रेरणा देते, ती म्हणजे त्यांच्या आईची अमेरिकेत येण्याची गोष्ट, जी भारतामध्ये सुरु झाली होती. कमला यांच्या आईमधील धाडसाने त्यांना इथंपर्यंत आणलं. तुम्हालाही या गोष्टीचा गर्व वाटत असेल. तुम्ही अमेरिकेचे आधार आहात. तुम्ही देशभक्त आहात  आणि धैर्याने कोरोनाचा सामना करत आहात, असं बायडेन यांनी भारतीय-अमेरिकी समुदायाला संबोधित करताना म्हटलं. बायडेन यांनी यावेळी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयावरही टीका केली. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election democratic joe biden said about india president donald trump kalma harris