US Election: 'ट्रम्प vs बायडेन'  कोण ठरलं वरचढ? वाचा डिबेटमधील महत्वाचे मुद्दे

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये लढत होणार आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये अखेरची प्रेसिडेंशियल डिबेट झाली. नैशविल येथे झालेल्या या डिबेटमध्ये मॉडरेटर NBC न्यूज करस्पॉन्डेंट क्रिस्टन वेल्कर यांच्यासमोर दोन्ही नेत्यांनी एकामेंकावर टीकास्त्र सोडले. यावेळी 6 मुद्द्यांवर चर्चा झाली आणि प्रत्येकाला बोलण्यासाठी 2-2 मिनिटे वेळ देण्यात आला होता. 

ट्रम्प आणि बायडेन यांच्या डिबेटमधील महत्वाचे मुद्दे-

- भारत, चीन आणि रशिया हवेच्या गुणवत्तेबाबत काळजी घेत नाहीत, पण अमेरिका घेते. भारत, चीन आणि रशिया या देशांमधील हवा घाणेरडी आहे. त्यांच्यासोबत आपली तुलना होऊ शकत नाही. पॅरिस करारासाठी आपण मोठ्या प्रमाणात पैसै देत होतो, पण आपल्याला योग्य वागणूक मिळाली नाही. त्यामुळेच अमेरिकेने पॅरिस करारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत.

- अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करु पाहणाऱ्या कोणत्याही देशाची गय केली जाणार नाही. त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असं ज्यो बायडेन म्हणाले आहेत. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी अमेरिकी अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की, ''रशिया आणि इराक 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या विचारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.'' 

-कोरोनावरील प्रभावी लस या आठवड्याभरात मिळेल, अशी घोषणा ट्रम्प त्यांनी केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी चांगली प्रगती करत आहे, डिंसेंबरच्या शेवटपर्यंत कोरोना लस मिळेल, पण त्यापूर्वीच मोठी बातमी येऊ शकते, असंही ते म्हणाले.

-ट्रम्प यांच्याकडे कोरोनाला हाताळण्यासाठी कोणतीही योजना नव्हती किंवा आताही नाही. विषाणूमुळे लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला अमेरिकेचा राष्ट्रपती होण्याचा काहीही अधिकार नाही. मी सत्तेत आलो तर मास्क बंधनकारण करेल आणि रॅपि़ड टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येतील, असं ज्यो बायडेन म्हणाले आहेत. 

- डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. उत्तर कोरियासोबत आपली युद्धसदृष्य स्थिती नाही. त्यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत, असं ते म्हणालेत. यावर प्रतिवाद करताना बायडेन म्हणाले की, ''हिटलरने यूरोपवर हल्ला करण्याआधीही आपले त्यांच्यासोबत चांगले संबंध होते.''  

-देशाला पूर्ण लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयाचे ट्रम्प यांनी समर्थन केले.  कोरोना काळात मी बायडेन सारखं बेसमेंटमध्ये लपून बसलो नाही. देशाला बंद केले जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. 

- जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. कोरोना महामारी लवकर जाईल, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. पण, आतापर्यंत 2,20,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आपण 'डार्क विंटर'मध्ये जात आहोत, पण ट्रम्प यांच्याकडे याला रोखण्यासाठी कोणतीही योजना नाही, अशी टीका बायडेन यांनी केली. 

- डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या मुलावर हल्ला चढवला. बराक ओबामांच्या सरकारमध्ये बायडेन यांच्या मुलाला व्यवसायात मोठा लाभ करुन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. परदेशी कंपनीकडून एक पेनीदेखील मला मिळालेली नाही, असं बायडेन म्हणाले आहेत.

दरम्यान, पहिल्या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प आक्रमक दिसत होते. त्यांनी अनेकवेळा प्रतिस्पर्धी बायडेन यांना बोलताना रोखले होते. दुसऱ्या डिबेटमध्ये ट्रम्प यांनी काहीसा मवाळपणा घेतल्याचे दिसले. पण, दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याटी एकही संधी सोडली नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election Donald trump and joe biden presidential debate important points