डोनाल्ड ट्रम्प यांना लशीची घाई; तज्ज्ञांना ठरविले चूक

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 17 September 2020

अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ढोल वाजू लागल्याने विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनावरील लस आणण्याची घाई झाली आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ढोल वाजू लागल्याने विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनावरील लस आणण्याची घाई झाली आहे. यासाठी ट्रम्प हे अगदी आरोग्य संशोधक आणि तज्ज्ञांची मते देखील फेटाळून लावत असल्याने आता त्यांनाच टीकेला सामोरे जावे लागत आहे. कोरोनावर ऑक्टोबरमध्ये लस आणण्याचे विधान करून ट्रम्प यांनी पुन्हा स्वतः चीच कोंडी करून घेतली.

अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेच्या प्रमुखांनी नुकतेच कोरोनाविरोधातील लढाईमध्ये मास्क हेच सर्वांत मोठे शस्त्र ठरणार असून २०२१ च्या उन्हाळ्यापर्यंत तरी कोरोनावर लस तयार होणे शक्य नसल्याचे म्हटले होते. यावर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सीडीसीच्या प्रमुखांचे म्हणणे फेटाळून लावले. ते म्हणाले की, मला वाटते की त्यांची चूक झाली असावी कारण त्यांनी दिलेली माहिती खरी नाही. आम्ही लसीच्या खूप जवळ आहोत, ऑक्टोबर महिन्यामध्येच यावर लस मिळू शकेल.

 मुलांचं मोबाईलचं व्यसन सोडवायचंय का? मग हे वाचा

सध्या आघाडीचे देश लसनिर्मितीत गुंतले असताना अमेरिकेने मात्र येत्या ऑक्टोबरमध्ये कोरोना लसीकरण मोहिम राबवण्याची शक्यता व्यक्त केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाखेरीस सुमारे १०० कोटी नागरिकांचे लसीकरण होऊ शकते, असे म्हटले आहे. जगभरात सध्या कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी उपाय मानला जात आहे. परिणामी आघाडीच्या देशातील शास्त्रज्ञ लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. सर्वात पहिली लस कोणता देश आणतो, यावरुन सध्या स्पर्धा लागली आहे. 

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ट्रेंड होतोय 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'

यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनाची लस लवकरच वितरीत होऊ शकते, असे म्हटले आहे. २०२० च्या अखेरपर्यंत देशातील सुमारे १०० कोटी नागरिकांना लस दिली जावू शकते, असेही ते म्हणाले. एका पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले, की देशात अत्यंत सुरक्षित आणि प्रभावीपणे लशींचे वितरण करण्यासाठी तयारी केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये लसीकरण मोहिम सुरू होऊ शकते आणि याबाबत लवकरच घोषणा केली जाईल. ऑक्टोबर किंवा त्यानंतर काही दिवसांनी परंतु निश्‍चितपणे लसीकरण मोहिम सुरू केली जाईल. ही मोहिम पुढेही सुरू राहिल आणि कोरोनाला कोणत्याही स्थितीत हद्दपार करु. या वेळी डेमोक्रॅटिक पक्षावर टीका करताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी लशींच्या सिद्धांताबाबत नकारात्मक बोलणे थांबवणे गरजेचे आहे. आपण बायडेन यांना अशा प्रकारची कृती करण्यापासून रोखू. बायडेन यांची भूमिका लशींचे महत्त्व कमी करणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump said about corona vaccine