डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "मला सुपरमॅन झाल्यासारखं वाटतय"

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 October 2020

कोविडवर उपचार घेतल्यानंतर मला ‘सुपरमॅन’ झाल्यासारखे वाटत आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन- कोविडवर उपचार घेतल्यानंतर मला ‘सुपरमॅन’ झाल्यासारखे वाटत आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोविडच्या उपचारामुळे आजाराशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाली असून आपण कोठेही मुक्तसंचार करु शकतो, असेही ट्रम्प म्हणाले.

दोन आठवड्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना तीन रात्र आणि चार दिवसासाठी सैनिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर आपण तंदुरुस्त असल्याचे त्यांनी जाहीर केले. व्हाइट हाऊसच्या वैद्यकीय पथकाने देखील त्यांना प्रचार सभा घेण्याची परवानगी दिली. काल ट्रम्प यांचे पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन येथील विमानतळावर जोरदार स्वागत झाले. येथील सभेत ते म्हणाले, की मी काही औषधे घेतल्यानंतर बरा झालो. ती कोणती औषधे होती, हे मला ठाउक नाही. ती प्रतिकारक्षमता विकसित औषधी होती का, हे देखील मला ठाउक नाही. परंतु त्यानंतर मी स्वत:ला सुपरमॅन समजू लागलो आहे. यावेळी ट्रम्प यांनी डॉक्टरांचे आभार मानले. माझ्यात आता रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे. आपण व्हाइट हाऊसच्या कोणत्याही मजल्यावर राहू शकतो. सभेत खाली येऊन कोणाचीही गळाभेट घेऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी या वेळी केला.

बांगलादेशही जाणार भारताच्या पुढे; गरीब देशांमध्ये भारताचा क्रमांक

मेलेनिया अद्याप सभेपासून दूरच

कोविडवर उपचार केल्यानंतर ट्रम्प यांनी प्रचार सुरू केला असला तरी त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प अद्याप सार्वजनिक ठिकाणी आलेल्या नाहीत. त्यांच्यात कोविडची किरकोळ लक्षणे असल्याचे गेल्या आठवड्यात सांगण्यात आले होते. पण त्या ट्रम्प यांच्या सभेत कधी सहभागी होतील, हे अद्याप व्हाइट हाऊसने स्पष्ट केलेले नाही.

बायडेन यांच्या विजयासाठी चीन आसुसलेला

ट्रम्प म्हणाले, की ज्यो बायडेन यांच्या विजयासाठी डाव्या विचारसरणीचे लोक, चीन आसुसलेले आहेत. कारण बायडेन हे आपल्या देशातील नोकऱ्या चिनी नागरिकांना बहाल करतील. या सुस्त व्यक्तीच्या (बायडेन) हाती सत्ता गेली तर अमेरिकेवर चीनचे वर्चस्व राहिल. आगामी चार वर्षात आपण अमेरिकेला उत्पादन क्षेत्रात सामर्थ्यवान देश करु आणि चीनवरची अवलंबिता संपून टाकू, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत बायडेन हे सर्वात वाईट उमेदवार असल्याची टीका ट्रम्प यांनी केली. यासाठी ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या चुकांचा पाढा वाचला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump said i feel like superman