बांगलादेशही जाणार भारताच्या पुढे; गरीब देशांमध्ये भारताचा क्रमांक

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 October 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची चाके गाळामध्ये रुतली असताना याचा भारताला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नवी दिल्ली- कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची चाके गाळामध्ये रुतली असताना याचा भारताला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील दरडोई उत्पन्नामध्ये भारत आणखी पिछाडीवर जाणार असून त्याचे स्थान बांगलादेशच्याही खाली जाईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) ताज्या अहवालातून उघड झाले आहे. यामुळे भारत हा आता दक्षिण आशियातील तिसरा सर्वांत गरीब देश बनेल.

अशी असेल वाढ

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दरडोई उत्पन्नाची डॉलरमध्ये तुलना करायची झाल्यास बांगलादेश यंदा चार टक्क्यांनी पुढे जाईल. हे उत्पन्न १ हजार ८८८ डॉलर एवढे असेल. भारताचे उत्पन्न मात्र १०.५ टक्क्यांपर्यंत म्हणजे १ हजार ८७७ डॉलरपर्यंत खाली येईल. मागील चार वर्षांतील हा निचांक मानला जातो.

'सुपरमॉम'; परीक्षा सुरु असतानाच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

गरिबांमध्ये भारत

या घसरणीमुळे दक्षिण आशियातील पाकिस्तान आणि नेपाळ या गरीब देशांच्या पंक्तीमध्ये भारताचाही समावेश होणार आहे. भुतान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या देशांतील दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेमध्ये वेगाने वाढणार आहे. दक्षिण आशियामध्ये श्रीलंकेनंतर कोरोनाचा मोठा फटका भारताला बसला असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

पुढील वर्षी सावरणार
पुढील वर्षी देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरण्याची शक्यता आहे, यामुळे २०२१ मध्ये आपण बांगलादेशपेक्षा किंचित आघाडी घेतलेली असेल असा अंदाज या संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे. तेव्हा ही वाढ ८.२ टक्के एवढी असेल. बांगलादेशमधील दरडोई उत्पन्न वाढायला सर्वात मोठा आधार हा निर्यात क्षेत्राकडून मिळाला आहे. तिथे गुंतवणूक बचतीचा दर देखील स्थिर आहे. भारतामध्ये मात्र या दोन्ही घटकांना जबर फटका बसला आहे.

द्वेषाने भरलेल्या भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची मागील सहा वर्षांतील ही देण आहे. बांगलादेश भारतावर मात करतो आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस अपयशाचे खापर राष्ट्रवादीवर फोडत आहे का? राम कदम यांचा सवाल

काय आहे प्रतिव्यक्ती जीडीपी?

देशातील एका व्यक्तीचा विचार केला तर तेथील आर्थिक उत्पादन किती आहे, हे दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून स्पष्ट होते. हे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी संबंध देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि त्या देशाची एकूण लोकसंख्या यांचा भागाकार करण्यात येतो. एखाद्या देशाच्या आर्थिक समृद्धीचे मोजमाप करण्यासाठी सध्या याच निकषाचा आधार घेतला जात आहे. बांगलादेशाची लोकसंख्या भारताच्या तुलनेमध्ये कमी असून तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्न मात्र वाढताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangladesh gdp will grater than india said imf