esakal | अमेरिकेच्या जनतेनं दुसऱ्यांदा नाकारलेले ट्रम्प पाचवे राष्ट्राध्यक्ष; 1992 नंतरचे पहिलेच
sakal

बोलून बातमी शोधा

trump is fifth president who lost second term in american history

बायडेन यांना 273 इलेक्टोरल मते आणि ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न यामुळे भंगले आहे.

अमेरिकेच्या जनतेनं दुसऱ्यांदा नाकारलेले ट्रम्प पाचवे राष्ट्राध्यक्ष; 1992 नंतरचे पहिलेच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार बायडेन यांना 273 इलेक्टोरल मते आणि ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न यामुळे भंगले आहे. जनतेनं दुसऱ्यांदा संधी नाकारलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष असून गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच असं झालं आहे. 

याआधी 1992 मध्ये जॉर्ज एच डब्ल्यू बूश यांना दुसऱी टर्म जिंकता आली नव्हती. त्यांच्याविरोधात बिल क्लिंटन यांनी निवडणूक जिंकली होती. बूश यांच्यानंतरचे तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सलग दोनवेळा निवडून आले आहेत. तसंच गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात फक्त चारच राष्ट्राध्यक्ष असे आहेत ज्यांना दुसऱ्यांदा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. आता या यादीमध्ये ट्रम्प यांचेही नाव जोडले गेलं आहे.

जॉर्ज एच डब्ल्यू बुश
1992 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाची दीर्घकाळाची सत्ता संपुष्टात आली होती. 1968 पासून रिपब्लिकन पक्षाची सत्ता अमेरिकेत होती. बुश दुसऱ्यांदा विजयी होतील असा अंदाज लावला जात होता मात्र क्लिंटन यांनी 370 इलेक्टोरल मते आणि 43 टक्के पॉप्युलर मते जिंकून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या बाजुला बूश यांना फक्त 37.3 टक्के पॉप्युलर मते आणि 168 इलेक्टोरल मते मिळाली होती. 

हे वाचा - US Election 2020 : ज्यो बायडेन बनले अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष; ट्रम्प यांच्यावर केली मात |

जिमी कार्टर
1980 मध्ये डेमोक्रेट पक्षाचे जिमी कार्टर यांना दुसऱ्या टर्मला पराभूत व्हावं लागलं होतं. रिपब्लिकनच्या रोनाल्ड रिगन यांना 50.7 टक्के पॉप्युलर मते मिळाली होती. 69 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेले रिगन हे सर्वाधिक वयाचे राष्ट्राध्यक्ष ठरले होते. त्यांच्यानंतर ट्रम्प 70 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झाले होते. 

जेराल्ड फोर्ड
1976 मध्ये जिमी कार्टर यांनी जेराल्ड फोर्ड यांना पराभूत केलं होतं. 1974 मध्ये वॉटरगेट स्कॅंडलमुळे रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर जेरॉल्ड फोर्ड यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते एकमेव असे राष्ट्राध्यक्ष होते जे इलेक्टोरल मतांशिवाय राष्ट्राध्यक्ष झाले होते. मात्र त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. 

बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम

हर्बर्ट हूवर 
रिपब्लिकन पक्षाचे हर्बर्ट हूवर यांना 1932 मध्ये दुसऱ्यावेळी पराभव पत्करावा लागला होता. डेमोक्रेटिक पक्षाच्या फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांनी त्यावेळी विजय मिळवला होता. अमेरिका मंदीच्या गर्तेत अडकली असताना झालेल्या त्या निवडणुकीत रूझवेल्ट यांनी हर्बर्ट यांना पराभूत केलं होतं. 

loading image
go to top