बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

मतदानाच्या टक्केवारीत प्रमुख ३५ देशांमध्ये अमेरिकेचा ३० वा क्रमांक आहे.

वॉशिंग्टन- कोरोनाचे संकट असतानाही यंदाच्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या १२० वर्षांतील विक्रमी मतदान झाले आहे. मतमोजणीचा आढावा घेणाऱ्या ‘यूएस इलेक्शन प्रोजेक्ट’ या खासगी निष्पक्ष संस्थेने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, या वर्षी २३ कोटी ९० लाख जण मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी १६ कोटी जणांनी आपला हक्क बजावला आहे. येत्या काही आठवड्यांत मतमोजणीची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर यामध्ये आणखी वाढ होणार आहे.

यंदाच्या निवडणूकीत ६६.९ टक्के मतदान झाले. यापेक्षा अधिक मतदान १९०० सालात झालेल्या निवडणूकीत (७३.७ टक्के) झाले होते. २०१६ मधील निवडणूकीत ५६ टक्के, तर २००८ मधील निवडणूकीत ५८ टक्के मतदान झाले होते. यंदा सर्वाधिक, म्हणजे ७९.२ टक्के मतदान मिनीसोटा आणि माइने राज्यात झाले. आयोवामध्ये ७८.६ टक्के झाले. सर्वांत कमी मतदान अर्कान्सस राज्यात (५६.१ टक्के) झाले. अमेरिकेत सर्वसाधारणपणे मतदानात निरुत्साह दिसून येतो. 

मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ

मतदानाच्या टक्केवारीत प्रमुख ३५ देशांमध्ये अमेरिकेचा ३० वा क्रमांक आहे. यंदाचे प्रचंड मतदान हा ट्रम्प आणि बायडेन यांची लोकप्रियता आणि प्रचंड गाजलेले वाद यामुळे निर्माण झालेली उत्सुकता यांचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बायडेन यांना ७ कोटी २० लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. २०१६ मध्ये त्यांच्याच पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना मिळालेल्या मतांपेक्षा ही मते ८० लाखांनी अधिक आहेत. ट्रम्प यांनाही आतापर्यंत ६ कोटी ८५ लाख मते मिळाली असून आतापर्यंत कोणत्याही रिपब्लिकन उमेदवाराला इतकी मते मिळाली नव्हती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump and joe biden 120 year old record