ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात डिबेट झालं.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मतदानाच्या आधी आता प्रेसिडेन्शियल डिबेटला सुरुवात झाली आहे. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात डिबेट झालं. यावेळी दोघेही आक्रमक झाले होते तसंच बायडेन यांनी ट्रम्प यांना तुम्ही गप्प बसा असा दमच दिला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला तर ते स्वीकारतील का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याला कारणही तसं आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, माझा पराभव झाला तर मी लगेच सत्ता सोडणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे खरंच असं झालं तर काय होईल याची चर्चा सुरू आहे. 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 16 सप्टेंबरला व्हाइट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी खळबळजनक असं वक्तव्य केलं होतं. ट्रम्प म्हणाले होते की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास सहजपणे सत्तेचं हस्तांतरण करणार नाही. त्यामुळे निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागू शकतो असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भडकलेल्या ट्रम्प यांनी प्रश्नाला बगल देऊन उत्तर टाळलं होतं. 

हे वाचा - बायडेन-ट्रम्प वादविवादात 'शट अप'; डिबेटमध्ये कोण ठरलं वरचढ?

ट्रम्प यांचे विरोधी उमेदवार जो बायडेन यांनी त्यांचे वक्तव्य हुकूमशाहीचं द्योतक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेत एखाद्या राष्ट्राध्यक्षांनी सत्ता गमावल्यावर अशी काही भूमिका घेतली तर काय? या विषयावर कायदेतज्ज्ञ लॉरेन्स डग्लस यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. Will He Go? असं नाव असलेल्या या पुस्तकातून अमेरिकेच्या संविधानातील त्रुटींवर भाष्य केलं आहे. 

अमेरिकेच्या संविधानात असा कोणताही कायदा नाही की ज्यामुळे शांततेनं सत्तेचा त्याग केला जाईल. संविधानाने फक्त सत्ता सहजपणे हस्तांतरित करण्याची अपेक्षा व्यक्त केली असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. एखाद्यावेळी राष्ट्राध्यक्षांनी सत्ता सोडण्यास नकार दिलाच तर गंभीर परिस्थिती ओढावू शकते. त्यामुळे ट्रम्प यांचे विधान विचार करायला लावणारे आहे. सत्ता बदल झाला आणि ट्रम्प त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणेच भूमिका घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टपालाद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका असल्याने निवडणुकीचा निकाल कदाचित सर्वोच्च न्यायालयातच लागेल. टपालाद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका असल्याने पराभव झाल्यास ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात.

हे वाचा - HIVतून पूर्णपणे बरा झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू

ट्रम्प यांच्या या विधानावर त्यांच्याच सहकाऱ्याने मिट रोमनीने ट्विट करून हल्ला केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “लोकशाहीचा मूलभूत मंत्र म्हणजे शांततेत सत्ता हस्तांतरण करणे, तसं झालं नाही तर आपला देश बेलारूस होईल. संविधानात दिलेल्या हमींचे पालन करण्यास ट्रम्प यांची अयोग्यता ही कल्पनेच्या पलिकडची आणि स्वीकारता न येणारी आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election what happen if donald trump not ready to leave white house after lost