अमेरिकेच्या सेऊल दूतावासाचे वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनास समर्थन

टीम ई-सकाळ
Sunday, 14 June 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात जोरदार निदर्शने करत असलेल्या आंदोलकांना ठग म्हणून असे संबोधले होते. त्यानंतर आता अमेरिकेच्या सेऊल मधील दूतावासाने आपल्या इमारतीवर ब्लॅक लाइव्ह्स मॅटरचे मोठे बॅनर लावत, वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेला समर्थन दिले आहे.

सेऊल : अमेरिकेत श्वेत पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेसह जगभरात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठण्यास सुरवात होऊन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सुरु झाले. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात जोरदार निदर्शने करत असलेल्या आंदोलकांना ठग म्हणून असे संबोधले होते. त्यानंतर आता अमेरिकेच्या सेऊल मधील दूतावासाने आपल्या इमारतीवर ब्लॅक लाइव्ह्स मॅटरचे मोठे बॅनर लावत, वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेला समर्थन दिले आहे.     

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. व त्याच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे देशभरात आंदोलनांना सुरवात होऊन, नंतर या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात होत असलेल्या निदर्शकांना हिंसक, लुटारू, देशविरोधी म्हणून संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनांना चिरडण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत असल्याचा आरोप सध्या अमेरिकेत होत आहे. त्यानंतर काल शनिवारी अमेरिकेच्या सेऊल मधील दूतावासाने आपल्या इमारतीवर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' असे लिहिलेले प्रचंड मोठे बॅनर लावले आहे. आणि या बॅनरचा फोटो आपल्या अधिकृत सोशल माध्यम ट्विटरवर पोस्ट केला असून, या पोस्टमध्ये अमेरिकेचे दूतावास सहकारी अमेरिकन नागरिकांच्या सहकार्याने एकमताने उभे आहेत आणि सकारात्मक बदलांच्या मागणीसाठी शांततापूर्वक निषेध करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच, इमारतीवर लावण्यात आलेला 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' हा बॅनर जातीय अन्याय आणि पोलिसांच्या क्रौर्याविरूद्धच्या लढ्याला आमचा पाठिंबा दर्शवितो कारण आम्ही अधिक समावेशक व न्यायप्रिय समाज होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ट्विट मध्ये अधोरेखित केले आहे.    

दरम्यान, याअगोदर देखील अमेरिकेच्या सेऊल मधील या दूतावासाने एलजीबीटीक्यू या वेगळी लैंगिकता असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अशाप्रकारचेच इंद्रधनुष्याचे सप्तरंग असलेला बॅनर लावला होता.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US embassy in Seoul supports Black Lives Matter anti-racism movement