'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

- निक्की हॅले यांचे मत
-दहशतवाद्याच्या मुद्‌द्‌यावर तोडगा आवश्‍यक

न्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दहशतवादी अमेरिकी सैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मुद्‌द्‌यावर समाधानकारक तोडगा काढत नाही, तोपर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत करू नये, असे संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकी राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले आहे.

अमेरिकेला हानीकारक किंवा नुकसानकारक ठरणाऱ्या देशांना अमेरिकेने मदत करण्याची गरज नाही, असे हॅले म्हणाल्या. पाठीत वार करणारे आणि दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई करण्यापासून रोखणाऱ्यांना पैसे देण्याची आवश्‍यकता नाही. आपण कोणाबरोबर करार करत आहोत, कोणासोबत काम करत आहोत यासाठी व्यूहरचनात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच वाटचाल करायला हवी. आपण मागचापुढचा विचार करत नाही आणि त्यापासून काय लाभ होणार आहे, याची तमा न बाळगता पैसे देतो. या भूमिकेवर विचार करायला हवा, असे त्यांनी नमूद केले. या वेळी निक्की यांनी पाकिस्तानचे उदाहरण सांगितले. आपण त्यांना एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक पैसे देतो आणि ते मात्र सतत दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. त्या बदल्यात दहशतवादी अमेरिकी सैनिकांना मारत आहेत. ही कृती कधीच मान्य होऊ शकत नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांबाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत एक डॉलर देखील दिला जाऊ नये. ही रक्कम थोडीथोडकी नाही, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, हॅली या वर्षाखेरीस राजदूतपदावरून दूर होत असून त्याजागी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्‍स न्यूजचे माजी पत्रकार हिथर नुआर्ट यांची नियुक्ती केली आहे. 46 वर्षीय निक्की हॅले यांनी दक्षिण कॅरोलिनाचे राज्यपाल म्हणून दोन वर्षे जबाबदारी सांभाळली होती. 

पाकिस्तानला मदत करण्यापूर्वी काही गोष्टी सांगायला हव्यात, जेणेकरून आपल्या सैनिकांना व दहशतवादाविरोधात लढाईसाठी मदत करता येईल. - निक्की हॅले, अमेरिकी राजदूत, संयुक्त राष्ट्रसंघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US envoy to UN Nikki Haley hits out at Pakistan for harbouring terrorism says shouldnt give them a dollar