संसर्ग रोखण्यात अमेरिकेला अद्यापही अपयश; जगभरातील तज्ज्ञांना आश्‍चर्य

पीटीआय
Monday, 10 August 2020

कोरोना विषाणूच्या धोक्याची पूर्ण जाणीव होण्याआधीच युरोपला आणि विशेषत:इटलीला विषाणूने ग्रासून टाकले होते.जगातील सर्वोत्तम आरोग्य यंत्रणा असलेल्या या देशात रस्त्यांवर सलाइन लावून बसलेली माणसे दिसत होती

रोम - अमेरिकेसारखा विकसीत आणि जगातील सर्वाधिक शक्तीमान देशही कोरोना संसर्गाला अद्याप नियंत्रणात आणू न शकल्याच्या वास्तवाने जगाला आश्‍चर्यचकीत करण्याबरोबरच चिंतेतही टाकले आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या लवकरच ५० लाखांचा टप्पा पार करण्याचा अंदाज आहे. 

कोरोना विषाणूच्या धोक्याची पूर्ण जाणीव होण्याआधीच युरोपला आणि विशेषत: इटलीला विषाणूने ग्रासून टाकले होते. जगातील सर्वोत्तम आरोग्य यंत्रणा असलेल्या या देशात रस्त्यांवर सलाइन लावून बसलेली माणसे दिसत होती. अजूनही इटलीमध्ये मृतांची संख्या ३५ हजार इतकी मोठी आहे. मात्र, ही संख्या वाढीचा वेग मात्र प्रचंड कमी झाला आहे. दहा आठवड्यांचा कडक लॉकडाउन लागू करत, नवीन रुग्णांचा तातडीने शोध घेत, मास्क लावण्याची नागरिकांनी लावून घेतलेली सवय आणि सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन यामुळे या देशाने रोग नियंत्रणाबाबत आदर्श निर्माण केला आहे. इटलीसारखाच लॉकडाउन अमेरिकेतही लागू करावा, असे मत इटलीमधील नागरिक व्यक्त करत आहे. युरोपमध्ये उद्रेक झाला होता, त्यावेळी उपचारांबाबत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण होते. अमेरिकेमध्ये संसर्ग उशिरा पसरला. त्यांना युरोपपेक्षा वेळ अधिक मिळाला आणि युरोपमधील अनुभवाचा फायदाही मिळाला. तरीही चार महिने होऊनही येथील रुग्णसंख्या वाढतच असल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. येथील मृतांची संख्याही एक लाख ६० हजारांच्या पुढे गेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्राझीलमध्ये मृत्युसंख्या एक लाखांवर 
रिओ दी जानेरो :
ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. या देशात पाच महिन्यांपूर्वी पहिला रुग्ण आढळल्यानंतर फार वेगाने संसर्ग पसरला असून अद्यापही तो नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. ब्राझीलमधील मृत्युदरही अधिक आहे. या देशात मे महिन्याच्या अखेरीपासूनच दररोज सरासरी एक हजार जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागत आहेत.

राम मंदिराची वजनदार घंटा तयार करण्यासाठी लागणार चार महिने

गेल्या चोवीस तासांमध्येही येथे ९०५ जणांचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २१ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील रुग्णांची संख्या ३० लाखांहून अधिक आहे. रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या याबाबतीत हा देश जगात दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये चाचण्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने वास्तव परिस्थिती अधिक भयावह आहे. असे असतानाही ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो हे संसर्गाबाबत फारसे गंभीर नाहीत. त्यांना स्वत:लाही कोरोनाची लागण झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुक्तीचे शंभर दिवस 
वेलिंग्टन :
जगभरात कोरोनाचे अद्यापही सावट असताना न्यूझीलंडने मात्र आज कोरोनामुक्तीचा शंभरावा दिवस साजरा केला. जगभरातील सर्व देशांसाठी या देशाने एक आदर्श प्रस्थापित केला आहे. या देशाची लोकसंख्या ५० लाख आहे. अमेरिकेत एवढ्या संख्येने कोरोनाबाधित आहेत. या देशात जनजीवन पूर्वपदावर आले आहे. फुटबॉल स्टेडियम, बार आणि रेस्टॉरंटमध्ये नेहमीप्रमाणे लोकांनी येणे-जाणे सुरु केले आहे. यातील कोणालाही संसर्ग होण्याची भीती वाटत नाही. अर्थात, संसर्ग पसरु नये, यासाठी सरकार दक्ष आहे. या देशात मार्च महिन्यात शंभर रुग्ण आढळले त्याच वेळी त्यांनी लॉकडाउन करत त्याची कडक अंमलबजावणी केली. गेल्या तीन महिन्यात बोटावर मोजण्याइतके नवीन रुग्ण आढळले असून तेही इतर देशांतून परतणारे नागरिक होते. तर्कशुद्ध नियम करून त्याची अंमलबजावणी आणि राजकीय नेतृत्वाने दाखविलेली संवेदनशीलता यामुळे हे यश मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US failure in preventing infection