अमेरिकेकडून भारताला लष्करी तंत्रज्ञानाचा 'हात'

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

महत्त्वाचे लष्करी तंत्रज्ञान आणि गोपनीय माहिती भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देत संयुक्त प्रकल्प राबविण्याबाबतच्या आराखड्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : महत्त्वाचे लष्करी तंत्रज्ञान आणि गोपनीय माहिती भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देत संयुक्त प्रकल्प राबविण्याबाबतच्या आराखड्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिकेतील कंपन्यांकडून भारतातील खासगी कंपन्यांना संरक्षणविषयक गोपनीय माहिती पुरविण्याबाबत सध्या कुठलाही करार नाही. महत्त्वाच्या लष्करी तंत्रज्ञानाचा संयुक्तपणे विकास करण्यास दोन्ही देशांमधील कंपन्या उत्सुक आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या माहितीच्या हस्तांतरणासाठी आराखडा तयार करण्यावर सध्या दोन्ही देश काम करीत आहेत, असे सांगण्यात आले. अत्यंत संवेदनशील लष्करी तंत्रज्ञान आणि संरक्षणविषयक गोपनीय माहिती भारतीय कंपन्यांना दिल्यास त्याची सुरक्षा आणि संरक्षणाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आराखड्यात समावेश असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही देशांदरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नव्या आराखड्यामुळे उद्योगातील सुरक्षा, उत्तरदायित्व आणि बैद्धिक संपदा हक्क आदींशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारचा आराखडा प्रत्यक्षात यावा म्हणून अमेरिकेतील संरक्षण उद्योग आग्रही आहे. लष्करी साहित्याचे उत्पादन करण्यासाठी भारतातील खासगी कंपन्यांबरोबर संयुक्त प्रकल्प उभारण्यास अमेरिकी कंपन्यांकडून प्राधान्य दिले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US help India to confer on confidential military technology