G-7 देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती I Russia Ukraine War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

us president joe bidens

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी रशियावर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केलीय.

G-7 देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती

Russia Ukraine War : रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढवलीय. अशातच आतापर्यंत युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेनं मात्र आता हात वर केले आहेत. युक्रेनमध्ये (Ukraine) सैन्य पाठवणार नसल्याचा मोठा निर्णय अमेरिकेनं घेतलाय. अशातच नाटो देशांनीही युक्रेनकडे पाठ फिरवली असल्याचं दिसतंय. त्यामुळं बलाढ्य रशियापुढं युक्रेनचा एकाकी लढा सुरुय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच या युद्धात युक्रेन एकटा पडलाय का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

रशियानं युक्रेनमध्ये लष्कर घुसवल्यानंतर अमेरिका आणि अन्य नाटो (NATO) देश त्यांना मदत करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, सध्या तरी युक्रेनचा एकाकी लढा सुरू असल्याचं दिसतंय. नाटो देशांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन us (President Joe Biden) यांनीही अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिला आहे. परंतु, रशियाला जे मदत करतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बायडन यांनी दिलाय.

युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. दरम्यान, बायडन म्हणाले की, युक्रेनमध्ये यूएस सैन्य नाही; पण 'नाटो (NATO) प्रदेशाच्या प्रत्येक इंचाच्या जमिनीचं रक्षण करण्यास अमेरिका कटिबद्ध आहे. एवढंच नाही तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचंही बायडन यांनी सांगितलंय.

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं पहिलं वक्तव्य समोर आलंय. बायडन यांनी रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याचं ठरवलंय. ते म्हणाले, G7 देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहेत. यासोबतच आम्ही युक्रेनच्या धाडसी लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आज सकाळी मी माझ्या G7 समकक्षांशी (प्रतिनिधी देश) भेटलो आणि युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अन्यायकारक हल्ल्याबद्दल चर्चा केली. बैठकीत रशियावर आणखी कडक निर्बंध आणि इतर आर्थिक निर्बंध लादण्यावर सहमती झालीय. G-7 हा जगातील सात प्रगत अर्थव्यवस्थांचा एक गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे.

तर, दुसरीकडं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी आपल्या भाषणात सांगितलंय की, युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू करण्याचं कारण म्हणजे, शेजारील देशांकडून येणाऱ्या धोक्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर, ही कारवाई सुरु झालीय. दरम्यान, आता युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या मदतीला कोणते देश येतात, याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुतीन यांनी बाहेरुन कुणीही हस्तक्षेप केल्यास याचे गंभीर परिणाम होती, अशी धमकीच दिलीय. पुतीन यांनी पश्चिमेकडील अमेरिका तसेच नाटोमधील देशांना उद्देशूनच ही धमकी दिल्याची चर्चा आहे.

तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी गुरुवारी रशियावर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केलीय. त्यांनी संसदेत युक्रेनवर दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, पुढील निर्बंधांनुसार, रशियन बँकांना लंडनच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर ठेवले जाईल. ब्रिटनने यापूर्वी पाच रशियन बँका आणि पुतीन यांच्या तीन मित्र राष्ट्रांवर निर्बंध जाहीर केले होते. रशियाचे अध्यक्ष पुतीन हे कधीही आपल्या हातांनी युक्रेनचे रक्त साफ करू शकणार नाहीत, असंही जॉन्सन म्हणाले. याआधी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याला युरोप खंडासाठी आपत्ती असल्याचं म्हटलं होतं. डाउनिंग स्ट्रीटमधील आपत्कालीन कॅबिनेट ऑफिस ब्रीफिंग रूम ए (कोब्रा) च्या बैठकीनंतर जॉन्सन यांनी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, "ही आपल्या खंडासाठी एक आपत्ती आहे."

जॉन्सन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संपर्क साधला आणि पुतीन यांनी युक्रेनियन लोकांविरुद्ध मोहीम सुरू केल्यामुळे पाश्चात्य देश गप्प बसणार नाहीत, अशी शपथ घेतली. फोनवरील संभाषणानंतर जॉन्सन यांनी काही वेळातच ट्विट केलं की, "युक्रेनमधील भीषण घटनांमुळे मी हैराण झालोय आणि पुढच्या पावलांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोललो आहे. रशियानं विनाकारण हल्ला करून रक्तपात आणि विनाशाचा मार्ग निवडला आहे. मात्र, ब्रिटन आणि आमचे मित्र देश निर्णायक उत्तर देतील, असाही त्यांनी इशारा दिलाय.

Web Title: Us President Joe Bidens First Reaction On Ukraine Russia War G7 Uk Canada France Germany On Devastating Packages Of Sanctions Against Russia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top