US Election: विरोधकांकडून मतांची चोरी- ट्रम्प; बायडन यांचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

आतापर्यंतचे निकाल आनंददायी आहेत. मी आशावादी आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. 

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. याचदरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करत रिपब्लिकन पक्षाच्या मतांची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आम्ही मोठ्या विजयाच्या दिशेने जात आहोत. पण विरोधी पक्षांकडून निकाल चोरीचा प्रयत्न केला जात आहे, असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे. तर दुसरीकडे जो बायडेन यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आतापर्यंतचे निकाल आनंददायी आहेत. मी आशावादी आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. 

ट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले की, आम्ही विरोधकांना असे करु देणार नाही. जेव्हा मतदान बंद होते तेव्हा मत कोणालाही देता येत नाही, असे सांगताना त्यांनी लवकरच आपण सर्वांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे. 

सुरुवातीच्या कलानुसार ट्रम्प हे बायडन यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत. आतापर्यंत इलेक्ट्रोरल मतांमध्ये बायडन आघाडीवर असून ते 225 जागांवर तर ट्रम्प 213 जागांपर्यंत पोहोचले आहे. 

हेही वाचा- अर्णव अटक प्रकरण : 'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; अमित शहांनी केली आणीबाणीशी तुलना

दरम्यान, महत्त्वाच्या राज्यांची मतमोजणी सुरु असून बायडेन यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मतमोजणीच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्मथकांनी संयम राखण्याची त्यांनी विनंती केली आहे. आतापर्यंत आलेले निकाल चांगले आहेत. मी आशावादी आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us presidential election 2020 donald trump tweet stealing votes joe biden