US election: यंदाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी; पहिल्यांदाच घडल्यात काही गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 November 2020

यंदाची अध्यक्षीय निवडणूक सर्वार्थाने वेगळी झाली.

वॉशिंग्टन, ता. ४ (पीटीआय) : यंदाची अध्यक्षीय निवडणूक सर्वार्थाने वेगळी झाली. अनेक वादांनी आणि न्यायालयीन लढायांनी भरलेल्या या निवडणुकीचा निकालही न्यायालयातच लागेल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत काही घटना प्रथमच घडल्या आहेत.

हे प्रथमच
- कृष्णवर्णीय महिलेला मोठ्या पक्षाकडून उमेदवारी
- दोन्ही उमेदवारी वयाच्या ७० च्या पुढील
- भयानक साथीच्या काळात प्रथमच निवडणूक
(१९१८ मध्ये मध्यावधी निवडणुकीत स्पॅनिश फ्लूची साथ असताना मतदान २० टक्क्यांनी घटले होते. तब्बल वीस लाख लोक पहिल्या महायुद्धातही गुंतले होते. १९२० च्या निवडणुकीपर्यंत साथ निघून गेली होती.)
- प्रचंड प्रमाणात आगाऊ मतदान
- मतदानाच्या दिवशी अध्यक्ष कोण याचा स्पष्ट अंदाज नाही
( १९३७ पर्यंत निवडणुकीचा निकाल लागण्यास मार्च महिना उजाडत असे. कारण मतमोजणी केंद्रात मतपेट्या पोचण्यास आणि त्यांची मोजणी करण्यास बराच वेळ जाई. २००० मध्येही निवडणूकीचा निकाल १२ डिसेंबरला न्यायालयात लागला. फ्लोरिडामधील मतदान थांबवून सर्वोच्च न्यायालयाने जॉर्ज डब्लू. बुश यांना विजयी घोषित केले होते)
- टपालाद्वारे मतदानावर अध्यक्षांकडून अविश्‍वास
- संसर्ग पसरत असतानाही डोनाल्ड ट्रम्प गावागावांत जाऊन प्रचारसभा घेत असताना सुरुवातीचा बराच काळ ज्यो बायडेन मात्र प्रचारसभा टाळत स्वत:ला आणि आपल्या समर्थकांना सुरक्षित ठेवत होते.

अपेक्षेप्रमाणे ‘इलेक्शन डे’च्या दिवशी अमेरिकेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा अंदाज आलेला नाही. ज्यो बायडेन यांच्याकडे आघाडी दिसत असली तरी अद्याप काही महत्त्वाच्या राज्यांमधील चित्र स्पष्ट व्हायचे असून निकाल अनपेक्षित असू शकतो. आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक वेगळी ठरली असून आता निकाल प्रक्रियेतही वेगळेपण राखले जाण्याची चिन्हे आहेत. नेहमीपेक्षा निकाल समोर येण्यास विलंब लागण्याचा अंदाज असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही तसेच सूतोवाच केले आहेत. काही राज्यांनी ‘इलेक्शन डे’नंतरही मतपत्रिका स्वीकारण्याचे धोरण स्वीकारले असल्याने परिस्थिती अवघड झाली असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US presidential election donald trump and joe biden america us