"एच-1बी' व्हिसाच्या प्रक्रियेत बदलांचा प्रस्ताव

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न

वॉशिंग्टन- अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसाच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला असून, त्यानुसार आता निर्धारित मुदतीमध्ये अमेरिकेतील कंपन्यांना आपली गरज इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून नोंदवावी लागणार आहे. अतिकुशल आणि उच्चवेतन असणाऱ्या कामगारांनाच या प्रकारचा व्हिसा मिळावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

अमेरिकेत उच्चशिक्षण घेतलेल्यांना आणि उच्चवेतन घेणाऱ्यांना प्राधान्य मिळावे म्हणून एच-1बी व्हिसाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी याबाबतचा प्रस्ताव मांडला आहे. सैद्धांतिक आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या विदेशी कामगारांना अमेरिकेत आणण्यासाठी एच-1बी व्हिसाचा उपयोग तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात करत असतात. या माध्यमातून भारत आणि चीनसारख्या देशांतील कुशल कामगारांना अमेरिकेत आणण्याची परवानगी मिळते. त्यामुळे एच-1बी व्हिसाच्या प्रक्रियेत काही बदल झाल्यास त्याचा थेट फटका भारत आणि चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो.

याबाबत शुक्रवारी ट्रम्प प्रशासनाने नोटीस जारी केली असून, त्यात नमूद करण्यात आले आहे, की विदेशी कामगारांना अमेरिकेत आणणाऱ्या कंपन्यांनी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून आपली गरज नोंदवावी. अमेरिकी कॉंग्रेसच्या निर्णयानुसार दर वर्षी 65 हजार एच-1बी व्हिसा दिले जातात. अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेल्यांनाच प्राधान्य मिळावे, यासाठी एच-1बी व्हिसाच्या प्रक्रियेत आवश्‍यक ते बदल करण्यात आले आहेत.

Web Title: US proposes changes to H-1B visas