रशिया, चीनच्या कंपनीवर अमेरिकेकडून निर्बंध

पीटीआय
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अमेरिकेने रशियाच्या प्रॉफीनेट पीटीई कंपनीवरदेखील बंदी घातली आहे. रशियाने त्यांच्या बंदरावरून उत्तर कोरियाच्या तीन जहाजांना इंधन भरण्याची आणि मालाची ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे.  

वॉशिंग्टन : उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादलेले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने रशिया आणि चीनच्या काही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमांवर दबाव कायम राखण्यासाठी अमेरिकेने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. 

उत्तर कोरिया जोपर्यंत संपूर्णपणे अण्वस्त्र कार्यक्रम रोखत नाही, तोपर्यंत अमेरिका चारही बाजूंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून छुप्या मार्गाने उत्तर कोरियाला मदत करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे हत्यार उगारले आहे. त्यानुसार उत्तर कोरियाला अल्कोहोल आणि सिगारेटचा पुरवठा करण्यासाठी खोटे कागदपत्रे जमा केल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने चीनची डालियान सन मून स्टार इंटरनॅशनल लॉजिस्टिक्‍स ट्रेडिंग कॉर्पोरेशन आणि संलग्न कंपनी सिंगापूरची एसआयएनएसएमएस पीटीईवर बंदी घातली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारला सिगारेटच्या बेकायदा उद्योगातून दरवर्षी सुमारे 1 अब्ज डॉलरचा लाभ होत असल्याचा आरोप अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने केला आहे.

अमेरिकेने रशियाच्या प्रॉफीनेट पीटीई कंपनीवरदेखील बंदी घातली आहे. रशियाने त्यांच्या बंदरावरून उत्तर कोरियाच्या तीन जहाजांना इंधन भरण्याची आणि मालाची ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US restricted on Russia Chinese company