भारत-पाक चर्चेसाठी अमेरिकेने मदत करावी : कुरेशी

पीटीआय
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा सुरू करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अमेरिकेला केली आहे. दक्षिण आशियातील दोन शेजारी देशांत सध्या द्विपक्षीय चर्चा बंद असल्याने अमेरिकेने पुढाकार घ्यावा, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. चर्चा झाली नाही तर तणावात भर पडू शकते, असेही कुरेशींनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकेने पाकिस्तानची विनंती फेटाळून लावली असल्याची कबुली कुरेशी यांनी दिली. 

तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी चर्चा केली होती. अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना कुरेशी म्हणाले, की आम्ही अमेरिकेला चर्चेत सहभाग घेण्याची विनंती कशाला केली? कारण आमच्यात द्विपक्षीय चर्चा बंद आहे. आम्हाला पश्‍चिम सीमेकडे लक्ष द्यायचे असून, तेथे पुढे जायचे आहे; परंतु आम्हाला पुढे वाटचाल करता येत नाही. कारण पूर्वीकडे (भारताबरोबर सीमा) पाहावे लागते. ही चांगली स्थिती नाही. या कामात आपण (अमेरिका) मदत करू शकाल का? तर उत्तर नकारार्थी आले. त्यांना द्विपक्षीय चर्चा हवी आहे, मात्र त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली नाहीत. अशा कारणामुळे दोन्ही देशांत तणाव वाढू शकतो, असा इशाराही कुरेशी यांनी दिला.

भारतीय नेत्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत कुरेशी म्हणाले, की अशा प्रकारच्या चर्चा बंद झाल्याने तणाव वाढेल आणि अलीकडच्या काळातील वक्तव्ये फारशी पोषक नाहीत. सर्जिकल स्ट्राइक आणि तत्सम गोष्टींना अर्थ नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. हे राजकारण आहे. कारण तेथे निवडणुका होत आहेत. पाकिस्तानचे नवे सरकार चर्चेला घाबरत नसल्याचाही दावा कुरेशींनी केला.

न्यूयॉर्क येथे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबरची बैठक रद्द झाल्याचा उल्लेख करत त्यांनी भारताने माघार घेतल्याचा आरोप केला. जर भारताकडे चर्चेसाठी काही चांगला पर्याय असेल तर तो सांगावा. संवाद सुरू ठेवला तर मुद्दे निकाली निघतील आणि क्षेत्रात स्थिरता येईल, असे कुरेशी म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The US should help the Indo Pak dialogue says Quereshi