कोरोनाच्या संकटात अमेरिकेला हन्नामुळे आणखी एक धोका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

कोरोनाने त्रस्त असलेल्या टेक्सासला आता वादळ व पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वादळामुळे अमेरिकेत अनेक ठिकाणी लोक अडकले आहे. 

वॉशिंग्टन -  अटलांटिक महासागरातील या वर्षातील पहिले चक्रीवादळ हन्नामुळे अमेरिकेतील दक्षिण टेक्सासमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाने त्रस्त असलेल्या टेक्सासला आता वादळ व पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वादळामुळे अमेरिकेत अनेक ठिकाणी लोक अडकले आहे. वादळाच्या तडाख्यात स्मशानभूमीचे शेडही उडून गेलं आहे. काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अडकलेल्या लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी सुरक्षित स्थळी नेत आहेत. वादळी वाऱ्याचा वेग इतका जोरदार होता की एक 18 चाकी वाहन पलटी झालं. हन्ना वादळाच्या आधीच तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्याने अमेरिकेला तडाखा दिला. 

चक्रीवादळामुळे येथील वातावरण काल दुपारनंतर बदलले. १४५ प्रतितास वेगाने वारे वाहायला लागले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अमेरिकेच्या ‘नॅशनल हुर्रिकेन सेंटर’ या हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनुसार पहिल्या श्रेणीतील वादळ दक्षिण टेक्सासमध्ये धडकले आहे. लोकांनी दक्ष राहण्याची व समुद्रकिनारी जाऊ नये. समुद्रात सहा फुटांपेक्षा मोठा लाटा उसळत असून वेगवान वाऱ्यामुळे स्थिती धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवार (ता.२७) पर्यंत ४५ सेंटीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. टेक्सासमधील कॅमेरॉन कॉउंटीसह अनेक भागात आत्तापर्यंत २३ सेंटीमीटर पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून सांगितलं की, अमेरिकन सरकार डग्लस वादळासह हन्नावर लक्ष ठेवून आहे. डग्लस वादळ प्रशांत महासागरात ह्युवाईच्या दिशेने येत आहे. हन्ना वादळाच्या तीन वर्षे आधी हार्वे वादळाने याठिकाणी हाहाकार माजवला होता. हार्वेमुळे 68 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 125 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. एईपी टेक्सासच्या मते दक्षिण टेक्सासमध्ये शनिवारपासून वीज नाही. गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी शनिवारी सांगितलं की, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US texah faces hurricane hanna may be reason for flood