
US to Exit World Health Organization : सोमवारी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. कोरोना महामारीच्या काळात ट्रम्प या जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात खूप आक्रमक होते. व्हाईट हाऊसमध्ये आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले की,जागतिक आरोग्य संघटना ( WHO)अमेरिकेच्या बाबतीत पक्षपाती आहे, चीनला महत्त्व दिले जात आहे. ते म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेची फसवणूक केली आहे.
शपथ घेतल्यानंतर ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी येथे अनेक महत्वांच्या आदेशांवर स्वाक्षरी केली. या दरम्यान त्यांनी बायडेन सरकारचे ७८ निर्णय रद्द केले आहेत. यासोबतच त्यांनी पॅरिस हवामान करारातून अमेरिकेच्या माघारची घोषणा केली.
ट्रम्प म्हणाले की आम्ही कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहोत. मी मागील सरकारने घेतलेले विनाशकारी निर्णय रद्द करेन. मागील सरकार हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार होते असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.