अमेरिका भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रे!

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

अमेरिकेच्या 'नाटो' सहकाऱ्यांच्या बरोबरीने भारतालाही अत्याधुनिक लष्करी साहित्य निर्यात करता यावे, यासाठी देशाच्या शस्त्र नियंत्रण निर्यात कायद्यात दुरुस्ती करण्याचे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडण्यात आले आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या 'नाटो' सहकाऱ्यांच्या बरोबरीने भारतालाही अत्याधुनिक लष्करी साहित्य निर्यात करता यावे, यासाठी देशाच्या शस्त्र नियंत्रण निर्यात कायद्यात दुरुस्ती करण्याचे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडण्यात आले आहे. 

इस्राईल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया याच 'नाटो' मित्रदेशांना अमेरिका उच्च तंत्रज्ञान वापरलेल्या लष्करी साहित्याची निर्यात करते. या देशांच्या बरोबरीने भारतालाही अशा साहित्याची निर्यात करता यावी यासाठी कायद्यात बदल करावा, असे विधेयक डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर मार्क वॉर्नर आणि रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कॉर्निन यांनी मांडले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून दिलेल्या दर्जावर मान्यतेची मोहोर उमटेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

भारत आणि अमेरिकेदरम्यान गेल्याच वर्षी दळणवळण, समन्वय आणि सुरक्षा करार झाला असून संरक्षण माहिती देवाणघेवाण कराराबाबतही उच्च पातळीवर चर्चा सुरू आहे. पुढील आठवड्यात जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी -20 देशांच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर हे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण व्यापारात मोठी वाढ होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US will give India a advanced weapons