Coronavirus : WHO ने केलीय चीनसोबत हातमिळवणी? अमेरिकन सिनेटरने केला आरोप!

वृत्तसंस्था
बुधवार, 1 एप्रिल 2020

कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ४०४३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १.८० लाख अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

न्यूयॉर्क : इटलीपाठोपाठ सध्या अमेरिकेला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता जागतिक आरोग्य संघटनेविरुद्ध (WHO) आवाज उठवला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर रिपब्लिकन नेते रिक स्कॉट यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच संघटनेला दिल्या जात असलेल्या निधीमध्येही कपात करावी, अशी मागणी केली आहे. अमेरिका सुरवातीपासूनच चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत दोषी ठरवत आहे. कोरोना व्हायरसबाबतची माहिती लपवून ठेवल्याचा आरोपही अमेरिकेने चीनवर केला होता. 

- खुशखबर! गॅस सिलेंडर झाला स्वस्त; तब्बल...

WHO च्या भूमिकेची चौकशी करावी

फ्लोरिडातील रिपब्लिकनचे सीनेटर असलेल्या रिक स्कॉट यांनी अमेरिकेने दिलेला निधी जागतिक आरोग्य संघटना चीनसाठी वापरत असल्याचा आरोप केला आहे. तसेच कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत संघटनेचे काय योगदान आहे, त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला दिल्या जात असलेल्या निधीमध्ये कपात करण्याचा सल्लाही त्यांनी अमेरिकी प्रशासनाला दिला आहे. चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या जवळकीबद्दलही स्कॉट यांनी चिंता व्यक्त केली होती.

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...

खोटी माहिती सांगत आहे WHO

पॉलिटिको वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यविषयक सूचनांची माहिती जगभरातील देशांना देणं हे डब्ल्यूएचओचं काम आहे. कारण देश त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरीत निर्णय घेऊ शकेल. मात्र, कोरोना व्हायरसवेळी ही संघटना अपयशी ठरली. कम्युनिस्ट चीनने त्यांच्या देशातील कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनामुळे मृत पावलेल्यांची खोटी आकडेवारी जाहीर केली. जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत माहीत होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही व्हाईट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओ आणि चीनवर जोरदार हल्ला चढवला होता. कोरोनाबद्दलची धोकादायक घंटा वारंवार वाजत होती, मात्र, डब्ल्यूएचओनं देशांना गाफील ठेवलं. चीनला वाचविण्याऐवजी जगातील सर्व देशांना याबाबत सावध केलं असतं, तर एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता. 

- Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!

डिसेंबर महिन्यातच चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाची पहिली केस समोर आली होती. आता अमेरिकेला कोरोनाने आपल्या विळख्यात ओढलं आहे. नाराज झालेल्या ट्रम्प यांनी कोरोनाचा चिनी व्हायरस असा उल्लेख केला होता. मात्र, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर त्यांनी याचा पुनरुच्चार केला नाही. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ४०४३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १.८० लाख अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: USA senator Rick Scott criticized WHO and China