कोरोना विषाणूवरील लस डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ठरणार वरदान?

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

अमेरिका कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. नोव्हेंबरमधील निवडणुकीआधी लस उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत. 

वॉशिंग्टन- जगभरात कोरोना महामारीने अक्षरश: थैमान घातले आहे. अशात कोरोना विषाणूवर लवकरात लवकर लस तयार व्हावी यासाठी अनेक देशातील वैज्ञानिक रात्रंदिवस काम करत आहेत. लस तयार करण्याच्या स्पर्धेत श्रीमंत देश पुढे असल्याचं दिसत आहेत. अमेरिका कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. नोव्हेंबरमधील निवडणुकीआधी लस उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत. 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावणार आहेत. अमेरिकेत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात ट्रम्प सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे. अशात काही तरी चमत्काराची ते अपेक्षा करत आहेत. कोरोना विषाणूवरील लस त्यांच्यासाठी वरदान ठरु शकते. याच दृष्टीने ट्रम्प यांनी निवडणुकीआधी लस उपलब्ध होण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. 

चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती
ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन वार्प स्पीड'या टास्क फोर्सची घोषणा केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तीन वेळा रिकॉर्ड या शब्दाचा उल्लेख केला. यामाध्यमातून त्यांनी कोरोनावरील लस विक्रमी वेळात उपलब्ध करुन देण्याचा दावा अमेरिकी नागरिकांपुढे केला आहे. टास्क फोर्सला 'ऑपरेशन वार्प स्पीड' हे नाव अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका स्टार ट्रेक यावरुन देण्यात आले आहे. वार्प हे सुपरसोनिक एअरक्राफ्टची कल्पना आहे, ज्याची स्पिड प्रकाशापेक्षाही अधिक आहे.

 'ऑपरेशन वार्प स्पीड' हे टास्क फोर्स अत्यंत जलद गतीने लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. तसेच लस शोधण्याचे काम सध्या प्रकाशाच्या गतीपेक्षाही अधिक गतीने होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 

PM मोदींनी त्यांच्या भाषणात बल्गेरियाच्या पंतप्रधानांचा उल्लेख का केला?
ट्रम्प लवकरात लवकर लस आणण्यासाठी उताविळ झाले आहे. मात्र, त्यांच्या या उताविळपणावर टीका होत आहे. प्रभावी लस तयार करण्यासाठी किमान 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, ट्रम्प 5-6 महिन्यातच लस आणण्यासाठी वैज्ञानिकांवर दबाव आणत आहेत. ट्रम्प यांची घाई नागरिकांच्या जीवावर उठू शकते, अशी टीका तज्ज्ञांनी केली आहे.

दरम्यान, लस तयार करण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागू करतो. शिवाय तो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागू शकतात. जगभरातील अनेक वैज्ञानिक गट लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. लस लवकर तयार करुन देश आपली मक्तेदारी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे 'लस राष्ट्रवादाचा' जन्म होऊ शकतो. निर्माण झालेली लस सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी ती पेटेंट मुक्त असावी, जेणेकरुन ती सर्व देशांसाठी उपलब्ध असेल अशी मागणी यामुळे जोर धरु लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The vaccine against the corona virus will be a boon for Donald Trump