चीनमध्ये विषाणूचा विळखा घट्ट 

पीटीआय
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये वाढतच असून, या साथीमुळे चीनमधील मृतांची संख्या गुरुवारपर्यंत १७० वर पोचली. या आजाराचा सर्वांत मोठा फटका बसलेल्या हुबेई प्रांतातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

बीजिंग - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये वाढतच असून, या साथीमुळे चीनमधील मृतांची संख्या गुरुवारपर्यंत १७० वर पोचली. या आजाराचा सर्वांत मोठा फटका बसलेल्या हुबेई प्रांतातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण नव्याने सतराशे जणांना झाली आहे, अशी माहिती चीनच्या सरकारने आज दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी हुवानमध्ये सर्वांत प्रथम कोरोना व्हायरसचा संसर्ग गेल्या डिसेंबर महिन्यात झाला. त्यानंतर त्याचा प्रसार जगभरात झाला. त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. त्याच वेळी भारत, जपान, अमेरिका आदी देशांनी वुहान आणि हुबेईतील अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नागरिकांना मायदेशी आणण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य 

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्यांची संख्या १७० झाली असून, या विषाणूमुळे न्यूमोनिया झालेल्या रुग्णांची संख्या सात हजार ७११ वर पोचली आहे. यापैकी एक हजार ३७० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारपर्यंत (ता. २९) नवे १२ हजार १६७ संशयित रुग्ण आढळल्याचे आयोगाच्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे. प्रकृती सुधारल्याने १२४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

बीजिंगमधील ५५ सबवे स्थानकांवर प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्याची सोय करण्यात आली आहे. तापमानात बदल आढळल्यास प्रवाशांना रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.

चीनमध्ये दक्षता
    चीनमध्ये प्रवास न करण्याच्या भारत, अमेरिका आणि जर्मनीच्या नागरिकांना सूचना
    देशांतर्गत आणि विदेश प्रवासास चीनमध्ये निर्बंध
    चीनमध्ये सध्या नव्या चांद्रवर्षानिमित्त सुट्या असून, त्या २ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत
    शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांचे वसंत ऋतूतील सत्र पुढे ढकलले
    सार्वजनिक कार्यक्रम, एकत्र प्रवासावर बंदी

भारतात दक्षता
    भारतीय नागरिकांना चीनमधून आणण्यासाठी स्थलांतर अर्ज भरण्यास सुरुवात 
    भारतातील एअर इंडिया, इंडिगोस ब्रिटिश एअरवेज, लायन एअर अशा विविध कंपन्यांची चीनमधील विमानेड्डाणे रद्द 
    एअर इंडियाची दिल्ली-शांघाय मार्गावरील सर्व उड्डाणे सेवा ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत बंद
    इंडिगोची बंगळूर-शांघाय विमानसेवा १ फेब्रुवारीपासून आणि दिल्ली-चेंगडू मार्गावरील विमाने १ ते २० फेब्रुवारी या काळात स्थगित
    भारतातील २३ हजार विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यापैकी २१ हजार विद्यार्थी वैद्यकीय शाखेत शिकत आहेत

विषाणूचा प्रसार
    हाँगकाँगमध्ये नवे दहा, तर तैवानमध्ये आठ रुग्ण आढळले
    अमेरिका, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरियाने त्यांच्या नागरिकांना चीनमधून परतण्यासाठी खास व्यवस्था केली
    पाकिस्तानमधील तीन संशयित रुग्ण विद्यार्थ्यांना संसर्ग नाही
    चीनमधून जपानला परतलेल्या २०० नागरिकांपैकी तिघांना लागण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virus in China