पाकिस्तान भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने कडक भूमिका स्वीकारत पाकिस्तानला मिळणारे फुकटचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत.

इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने कडक भूमिका स्वीकारत पाकिस्तानला मिळणारे फुकटचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत. 'आम्हाला याचा काहीही फरक पडत नाही' अशी पाकिस्तानने अधिकृतरित्या भूमिका घेतली असली, तरीही प्रत्यक्षात त्यांच्याकडील परिस्थिती भीषण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून पाकिस्तानमधीलच अनेक संस्थांनी त्या देशामधील भीषण पाणीटंचाईवर भाष्य केले आहे. त्यात भारताने पाणी तोडले, तर पाकिस्तानमध्ये अराजक निर्माण होऊ शकते. 

आमचे पाणी बंद केल्याने काही फरक पडत नाही

शुद्ध पाण्याचा तुटवडा असलेल्या देशांच्या क्रमवारीत पाकिस्तान सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाचा (यूएनडीपी) आणि पाकिस्तानच्या जलस्रोत संशोधन समितीच्या (पीसीआरडब्ल्यूआर) अहवालामध्येही त्या देशातील पाण्याच्या टंचाईवर कठोर भाष्य करण्यात आले आहे. 'अशीच परिस्थिती कायम राहिली, तर 2025 पर्यंत पाकिस्तानमध्ये पूर्ण दुष्काळ असेल', असा इशारा गेल्याच वर्षी देण्यात आला होता. तसेच, '2040 पर्यंत पाकिस्तान हा पाण्याचा सर्वाधिक तुटवडा असलेला देश ठरेल', असे भाकीतही अभ्यासकांनी वर्तविले आहे. 'पाणी टंचाई हा पाकिस्तानला दहशतवादापेक्षाही अधिक भेडसावणारा प्रश्‍न आहे', असेही काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानात भीषण पाणीटंचाई

2016 मध्ये 'पीसीआरडब्ल्यूआर'ने एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार, 1990 मध्ये पाकिस्तानमध्ये मागणीएवढे पाणी कसेबसे पुरविले जात होते. त्यानंतर 2005 पासून पाकिस्तानमध्ये पाणी टंचाई सुरू झाली. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा पाकिस्तानमध्ये दरडोई उपलब्ध पाण्याचे प्रमाण 5600 क्‍युबिक मीटर्स होते. हेच प्रमाण आता 2009 मध्ये 1500 क्‍युबिक मीटर्स होते, तर आता हेच प्रमाण 1017 क्‍युबिक मीटर्स इतके खाली आले आहे. 

पायाभूत सुविधाच नाहीत.. अडवणार कसं पाणी? 
पाण्याची उपलब्धता असली, तरीही पाकिस्तानमध्ये पाणी अडविण्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची उभारणी झालेली नाही. त्याचा फटका पाकिस्तानमधील शेतीलाही बसत आहे. 'टेक्‍नॉलॉजी टाईम्स' या पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या विश्‍लेषणानुसार, 1960 नंतर पाकिस्तानमध्ये नव्या धरणांची उभारणी अपेक्षित प्रमाणात झालेली नाही. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या धरणांमध्ये पाकिस्तान केवळ 30 दिवसांचा पाणीसाठा करू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण 120 दिवसांचे आहे. 

पाकिस्तानमधीलच एका सरकारी अहवालानुसार, धरणे किंवा जलाशयांचे बांधकाम न केल्याने तेथे दर वर्षी 70 अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेले पाणी समुद्रात वाहून जात आहे. 

परिणाम काय? 
या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका पाकिस्तानमधील शेतीला बसणार आहे. कृषी क्षेत्राचा पाकिस्तानच्या एकूण निर्यातीतील 75 टक्के हिस्सा आहे, सकल राष्ट्रीय उत्पादनात 20 टक्के हिस्सा आणि एकूण कामगारांमध्ये 42 टक्के वाटा आहे. त्यामुळे इतक्‍या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water crisis Why is Pakistan running dry