
रशियाकडूनही इंधन खरेदी करू
कोलंबो - आर्थिक आणि राजकीय अस्थैर्य निर्माण झालेल्या श्रीलंकेत इंधनाची अत्यंत कमतरता भासत असल्याने आम्हाला रशियाकडून इंधन विकत घ्यावे लागेल, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आज सांगितले.
श्रीलंकेच्या अडचणीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रानिल विक्रमसिंघे यांनी आज ‘असोसिएटेड प्रेस’ला मुलाखत दिली. चीनने दिलेल्या कर्जाचा डोंगर फेडणे बाकी असतानाही त्यांच्याकडून आणखी कर्ज घेण्यास आपण तयार आहोत, असे विक्रमसिंघे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती ही आमच्या नेत्यांच्या चुकीमुळेच निर्माण झाली आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे या अडचणीत भर पडली आहे. श्रीलंकेला २०२४ पर्यंत अन्नटंचाई भासू शकते. रशियानेही आम्हाला गहू देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडून इंधन खरेदी करण्यासही आम्ही तयार आहोत. सध्या मात्र आम्ही आखाती देशांकडूनच इंधन खरेदीसाठी प्रयत्न करत आहोत.’
रशियाकडून इंधन खरेदी करण्यास अमेरिकेने निर्बंध जाहीर केले आहेत. मात्र, या युद्धात श्रीलंका तटस्थ आहे. देशातील स्थिती पाहता त्यांना इंधनाची अत्यंत आवश्यकता असून त्यांच्या नेहमीच्या निर्यातदार देशांनी इंधन पुरविले नाही तर रशियाकडूनही ते खरेदी करण्याचा पर्याय येथील सरकारने खुला ठेवला आहे. श्रीलंकेवर एकूण ५१ अब्ज डॉलरचे परकी कर्ज असून या वर्षीचा सात अब्ज डॉलरचा हप्ता थकीत आहे. आपण हे कर्ज फेडू शकत नाही, असे श्रीलंकेने जाहीर केले आहे.
Web Title: We Will Also Buy Fuel From Russia Prime Minister Ranil Wickremesinghe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..