किम यांच्या निर्णयाचे ट्रम्प यांच्याकडून स्वागत

पीटीआय
गुरुवार, 14 जून 2018

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशातील अण्वस्त्र नष्ट करण्याच्या निर्णयाचे आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. किम यांचा निर्णय हा देशातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने पहिले धाडसी पाऊल असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशातील अण्वस्त्र नष्ट करण्याच्या निर्णयाचे आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. किम यांचा निर्णय हा देशातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने पहिले धाडसी पाऊल असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. 

सिंगापूर भेटीत किम जोंग उन यांनी काल द्विपक्षीय चर्चेत अमेरिकेला सुरक्षा हमीच्या बदल्यात अणुमुक्ततेच्या दिशेने काम करण्याची हमी दिली होती. ट्रम्प यांनी आज वॉशिंग्टन डिसीकडे जाताना आपल्या एअरफोर्स वन विमानातून ट्‌विट करताना म्हटले की, अण्वस्त्रमुक्तीची घोषणा करणाऱ्या किम यांचे आभार मानतो. अमेरिका आणि उत्तर कोरियांच्या प्रमुखांतील ऐतिहासिक भेटीने ही बाब सिद्ध केली की, ठरवले तर बदल घडवून आणणे शक्‍य आहे. सिंगापूरचा दौरा हा आपल्यासाठी संस्मरणीय आणि सुखद अनुभव देणारा राहील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नात बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. किम जोंग यांच्याबरोबरची द्विपक्षीय बैठक चांगली राहिली. युद्ध कोणीही करू शकतो, मात्र सर्वांत धाडसी व्यक्ती हा शांतता प्रस्थापित करू शकतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

पॉम्पिओ दक्षिण कोरियाकडे 
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हे ट्रम्प आणि किम यांच्यातील द्विपक्षीय चर्चेची माहिती देण्यासाठी चीन आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. सिंगापूरची द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर त्यांनी दक्षिण कोरिया आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि भेटीची थोडक्‍यात माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcoming Kim's decision to Trump