Wendy Sherman : भारतातही केली होती फुग्यांद्वारे हेरगिरी; वेंडी शेरमन

अमेरिकेचा दावा; लष्करी माहिती गोळा केल्याची शक्यता
Wendy Sherman has claimed China had previously spied on India and Japan by releasing balloons
Wendy Sherman has claimed China had previously spied on India and Japan by releasing balloonssakal
Updated on

वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेमध्ये अतिउंचीवर सोडलेला फुगा हा हेरगिरी करण्यासाठी सोडला होता, या अमेरिकेच्या आरोपांनंतर वातावरण तापले असतानाच चीनने याआधीही अशाच प्रकारे फुगे सोडून भारत आणि जपानसह इतर अनेक देशांमध्ये हेरगिरी केली होती, असा दावा अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन यांनी केला आहे.

वेंडी शेरमन यांनी भारतासह अमेरिकेच्या ४० मित्रदेशांच्या अधिकाऱ्यांना चीनच्या हेरगिरीच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली असून त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून चीनच्या हेनान प्रांतातून हेरगिरी करण्यासाठी फुगे सोडले जात आहेत. हे फुगे जेट विमानांच्या उड्डाण उंचीपेक्षा वरच्या भागातून जात संबंधित देशांमधील लष्करी तळांची माहिती गोळा करतात. चीनने जपान, भारत, व्हिएतनाम, तैवान आणि फिलिपीन्स या देशांमध्ये या पूर्वी असे फुगे सोडले होते.

या फुगे प्रकरणाबद्दल ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही अनेक तज्ज्ञांची माहिती घेऊन अहवाल प्रसिद्ध केला आहे. हेरगिरी करणाऱ्या या फुग्यांचे नियंत्रण चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडे असते. असे फुगे पाच खंडांमध्ये यापूर्वी दिसून आले आहेत. अमेरिकेवरही गेल्या आठवड्यात पाडलेल्या फुग्याच्या व्यतिरिक्त हवाई, फ्लोरिडा, टेक्सास येथेही एकूण चाग फुगे आढळले होते, असे अहवालात म्हटले आहे.

... तर चीनवर कारवाई : बायडेन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई हद्दीत शिरलेल्या चीनच्या फुग्याच्या प्रकरणावरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. चीनच्या फुग्याचे तुकडे परत तर करणार नाहीच, पण चीनमुळे आमच्या स्वायत्ततेला धोका निर्माण झाल्यास योग्य ती कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज दिला.

अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहात बोलताना बायडेन यांनी चीनला खडे बोल सुनावले. ते म्हणाले,‘‘अमेरिकेच्या हिताचा विचार करून आम्ही चीन सरकारला सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. मात्र, चीनने आमच्या स्वायत्ततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आमच्या देशाचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई करू.

चीनने सोडलेला फुगा आम्ही पाडला असून त्याचे अवशेष आम्ही चीनला परत करणार नाही.’’ बायडेन यांनी आजच्या त्यांच्या भाषणात देशातील एकजुटीला विशेष महत्त्व दिले. चीनबरोबरील स्पर्धा जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एक होणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

जगासमोर आज पर्यावरण, आरोग्य, अन्नसुरक्षा, दहशतवाद, विस्तारवाद अशा अनेक समस्या असून त्यांचा सामना करण्यासाठी जगाला एकजूट करण्याचे काम अमेरिका करत आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.