WHO ने केलं पाकिस्तानचे कौतुक; इतर देशांना शिकण्याचा दिला सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 September 2020

कोरोना विषाणू महामारीविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या उपाययोजनांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं आहे.

इस्लामाबाद- कोरोना विषाणू महामारीविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या उपाययोजनांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनहोम यांनी व्हिडिओ परिषदेत बोलताना पाकिस्तान सरकारचे कौतुक केलं आहे. तसेच जगातील देशांनी पाकिस्तानकडून शिकायला हवं, असं ते म्हणाले आहेत. टेड्रोस यांनी कोरोना विरोधातील पाकिस्तान सरकारच्या रणनीतीचे समर्थन केलंय. 

पाकिस्तानच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशंसा

पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांपासून पोलिओसाठी एक मूलभूत संरचना तयार केली आहे. याच्याच साह्याने पाकिस्तान सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचं टेड्रोस म्हणाले आहेत. आरोग्य संघटनेने पाकिस्तानच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही प्रशंसा केली. या कार्यकर्त्यांनी पोलिओसाठी घरोघरी जाऊन लहान बाळांना लसीकरण करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. याचाच फायदा त्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यात झाला असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. 

घाई गडबड केल्यानं चीन पडलं तोंडावर; लाँचिंगवेळी सॅटेलाइट भरकटल्याने क्रॅश

पोलिओ कार्यकर्त्यांमुळे कोरोनावर विजय

पाकिस्तानने आपल्या पोलिओ कार्यकर्त्यांचा उपयोग देखरेख, संपर्क ट्रेसिंग आणि काळजी घेण्यासाठी केला. यामुळेच देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानशिवाय थाईलँड, कंबोडिया, जपान, न्यूझीलँड, कोरिया गणराज्य, रवांडा, सेनेगल, इटली, स्पेन आणि व्हिएतनाम या देशांनीही कोरोनाविरोधात लढताना चांगली कामगिरी केली आहे, असं आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट- पाकिस्तान

जागतिक आरोग्य संघटनेच्या या कौतुकानंतर पाकिस्ताननेही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान इमरान खान यांच्या आरोग्य विभागाचे माजी विशेष सहाय्यक डॉ. जफर मिर्जा म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी भविष्यात महामारीविरोधात लढण्यासाठी ज्यांच्याकडून शिकता येईल, अशा सात देशांचा उल्लेख केला आहे. त्यात पाकिस्तानचा समावेश असणे आमच्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे.

नाओमीने दुसऱ्यांदा जिंकली अमेरिकन ओपन; अझारेंकाचं स्वप्न पुन्हा अधुरं

पाकिस्तानात कोरोना नियत्रंणात! 

पाकिस्तानमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाची ५८४ नवी प्रकरणे समोर आली आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,००,९५५ झाली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संक्रमणाने मरणाऱ्यांची संख्या ६,३७३ इतकी झाली आहे. पाकिस्तानने कोरोना महामारीला नियंत्रणात ठेवल्याचं दिसत आहे.  

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who chief praises pakistan over corona virus fight

टॉपिकस
Topic Tags: