
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एक नवा सावधगिरीचा इशारा दिला आहे.
कोरोना व्हेरियंटमुळे चिंता वाढणार?, WHOकडून सावधगिरीचा इशारा
सध्या देशासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. देशातील काही भागांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. तरीही नागरिकांकडून म्हणावी तशी काळजी घेतली जात नसल्याने भारतात काही राज्यांमध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एक नवा सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोरोनाचे पुढील व्हेरियंट चिंतेचे कारण असू शकतात, असं WHO कडून सांगण्यात आला आहे.
हेही वाचा: चिंता वाढली! केरळमध्ये पुन्हा मास्कसक्ती
डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड हेड मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे, त्या म्हणतात, कोरोनाचा पुढील प्रकार काय असेल याबाबत अनिश्चितता असली तरी आमच्यासाठी चिंतेचे कारण आहे. त्यामुळे कोरोनाच्या पुढील व्हेरियंटसाठी विविध योजना आखणे आवश्यक असणार आहे. तसेच ओमायक्रॉन सध्या जगभरात प्रभावी आहे. BA.4, BA.5, BA.2.12.1 या प्रकारातील व्हेरियंट चिंतेचे कारण बनू शकतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असला तरी कोविड-19 वर आपल्याकडे बऱ्यापैकी उपाय उपलब्ध आहेत. ओमायक्रॉनमुळं अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना गंभीर आजारांना आणि पोस्ट कोविडमुळं त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामुळं कोरोनाच्या पुढील व्हेरियंटचा सामना करण्यासाठी आपल्याला उपलब्ध साधनांचा तर्कशुद्ध पद्धतीनं वापर करावा लागणार आहे. आपल्याकडे अशी संसाधने आहेत जी जीव वाचवू शकतात परंतु आपल्याला त्यांचा वापर धोरणात्मकपणे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: Twitter नंतर Coca Cola कडे मोर्चा, एलॉन मस्क यांची नवी घोषणा
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितल्याप्रमाणे, कोविड-19 च्या टेस्टिंग कमी झाल्या आहेत. त्यामुळं कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचं दिसत आहे. जागतिक स्तरावर कोरोना मृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. मात्र कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. गेल्या आठवड्यात कोविड मृत्यू संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओकडे आठवड्यात 15 हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. जी मार्च 2020 नंतरची सर्वात कमी मृत्यू संख्या आहे. मृत्यू कमी होणं काहीसं समाधानकारक असलं तरी कोरोना संपूर्णपणे संपलेला नल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Web Title: Who Says To Take Care Upcoming Corona Variant Creates Problems Maria Van Kerkhove
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..