एकही लस 50 टक्केसुद्धा निकष पूर्ण करू शकली नाही; WHO ने दिली धक्कादायक माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

WHO ने कोरोना व्हॅक्सिनचे प्रत्यक्षात लसीकरण कधी सुरु होईल याबाबत माहिती दिली आहे. 

जिनिव्हा - कोरोनाच्या संकटाशी देश लढत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या वक्तव्याने चिंता निर्माण झाली आहे. WHO ने कोरोना व्हॅक्सिनचे प्रत्यक्षात लसीकरण कधी सुरु होईल याबाबत माहिती दिली आहे. कोरोना व्हॅक्सिन लवकर येईल आणि या संकटातून आपण बाहेर पडू अशी आशा जगाला वाटत असताना WHO ने कोरोनाच्या लशीचे लसीकरण पुढच्या वर्षी मध्यापर्यंत होईल असं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जितक्या औषध कंपन्यांनी तयार केलेल्या कोरोना लशींची चाचणी झाली त्यापैकी एकही लस 50 टक्क्यांपर्यंत निकष पूर्ण करू शकली नाही अशी धक्कादायक माहिती दिली. 

हे वाचा - पाकिस्तानला मोठा झटका; चीन अध्यक्षांचा पाक दौरा रद्द

एका बाजुला जागतिक आरोग्य संघटनेनं लस येण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागेल असं म्हटलं असताना अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संस्थांना सांगितलं की, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत दोन व्हॅक्सिन तयार करू शकतो.

गेल्या आठवड्यात सीडीसीने काही कागदपत्रे पाठवली होती. त्यामध्ये व्हॅक्सिनला ए आणि बी अशी नावे दिली होती. यामध्ये व्हॅक्सिनशी संबंधित महत्वाची माहिती आहे. व्हॅक्सिनचं संशोधन करताना तापमान किती ठेवायचं आहे यासारख्या माहितीचा समावेश आहे. मॉडर्ना आणि फायजर कंपन्यांनी तयार केलेल्या व्हॅक्सिनच्या निकषांशी मिळतेजुळते असे निकष आहेत. 

हे वाचा - चीनचे विमान पाडले का नाही? तैवानने केला खुलासा

अमेरिकेत अॅस्ट्राजेनेकाने तयार केलेली व्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. याची घोषणा ट्रम्प यांनी याआधी केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 80 ठिकाणी 30 हजारांहून अधिक जणांवर याची चाचणी घेतली जात आहे. पुढच्या काही महिन्यात ही लस उपलब्ध होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who says vaccinations against covid 19 not expected until next year