चीन नरमला; कोरोना उत्पत्तीविषयी अभ्यास करणाऱ्या WHO टीमला दिली देशात एंट्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबतच्या तपासणी आणि संशोधनासाठी चीन आता तयार झाला आहे.

वुहान : कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबतच्या तपासणी आणि संशोधनासाठी चीन आता तयार झाला आहे. चीनने आता जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमला आपल्या देशात येण्यासाठी मंजूरी दिली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेची टीम गुरुवारी म्हणजेच 14 जानेवारी रोजी चीनचा दौरा करणार आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने व्हिसाचे कारण देऊन या टीमला येण्यास मज्जाव केला होता. मात्र, आज सोमवारी चीनने म्हटलं की जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेषज्ज्ञाचा एक समूह गुरुवारी कोरोना व्हायरस महामारीच्या निर्मितीच्या तपासासाठी येणार आहे. 

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी एका वाक्यातच घोषणा केली की जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ चीनच्या तज्ज्ञांसोबत बैठक करतील. याव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती चीनकडून देण्यात आली नाहीये. मात्र, अद्याप हे स्पष्ट नाहीये की आरोग्य संघटनेची टीम वुहानचा दौरा करेल की नाही, जिथून खऱ्या अर्थाने कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात  पसरला. चीनने यासंदर्भात अद्याप काही स्पष्टीकरण दिले नाहीये.

हेही वाचा - चीनचा खोडकरपणा सुरुच, कोरोनाविषयी अभ्यास करणाऱ्या टीमला रोखलं; WHO चे प्रमुख नाराज

टेड्रोस एडनॉम यांनी व्यक्त केली होती नाराजी
चीनने करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली होती. जिनिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. त्यांनी म्हटलं होतं की, त्यांच्या टीमला चीनमध्ये प्रवेश देण्याविषयी चीनला फोन केला होता. मी या बातमीने खूपच निराश झालोय की, आधीच टीममधील दोन सदस्य आपल्या प्रवासात आहेत आणि बाकीच्या सदस्यांना ऐनवेळी प्रवास करु दिला नाही. त्यांनी पुढे म्हटलं होतं की, मी वरिष्ठ चीनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि मी त्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं आहे की, हे मिशन जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय टीमच्या प्राधान्यक्रमाचा भाग आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्ती कार्यक्रमाचे प्रमुख मायकल रेयान यांनी म्हटलं होतं की, तज्ज्ञांना मंगळवारी तिथे पोहोचणे अपेक्षित होतं. मात्र त्यांना तिथे व्हिसासहित इतर आवश्यक मंजूरी दिल्या गेल्या नाहीयेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्हायरसच्या वाढत्या प्रकोपाच्या दरम्यानच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांची भेट घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who team to visit china on thursday for covid19 origin