कोरोनावर डब्लूएचओचा मोठा इशारा   

WHO Chief.jpg
WHO Chief.jpg

जिनिव्हा : कोरोना विषाणूचा जागतिक प्रसार अधिक वेगाने होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) प्रमुख टेड्रोस गेब्रेएसेस यांनी आज चिंता व्यक्त केली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचे म्हणत, डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेएसेस यांनी कोरोनाचा धोका अधिकच वाढल्याचे म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी उलट वाढच होत असल्याचे पाहायला मिळत आहे.    

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील सर्वच देश मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. मात्र अजून तरी यावर कोणताही पर्याय मिळाला नाही. अशातच सर्वच देशांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळल्याने काही देशांनी लॉकडाउन हटविण्याचा किंवा लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यापूर्वी हा निर्णय महागात पडू शकण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली होती. त्यानंतर आता जगभरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोनाचा दुसरा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेएसेस यांनी म्हटले आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड, तसेच पश्चिम व दक्षिण आशिया या क्षेत्रात कोरोनाचा होत असलेला विस्तार हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत, जग आता धोकादायक वळणावर आल्याचे टेड्रोस गेब्रेएसेस यांनी म्हटले आहे. त्यामुळे या महामारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे टेड्रोस गेब्रेएसेस यांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.              

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्वच देशांची अर्थव्यवस्था खिळखिळीत झाल्याने, काही देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या विषाणूचा पुढचा टप्पा येण्याची शक्यता असल्याचे डब्लूएचओने यापूर्वीच म्हटले होते. संपूर्ण जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळ जवळ ८७ लाखांवर पोहचली असून, या विषाणूच्या संसर्गाने ४ लाख ६० हजार १२ जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे अजूनतरी कोरोना विषाणूचा अटकाव करता येऊ शकत नसल्याने लॉकडाउन हटविणे जोखमीचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २२ लाखांच्या वर पोहचली आहे. आणि १ लाख १९ हजार ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर त्यानंतर ब्राझील या देशात कोरोनाने हाहाकार उडवलेला असून, १० लाख ३२ हजार ९१३ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. व मृत्यूची संख्या ५० हजार पर्यंत पोहचली आहे. मागील २४ तासात ब्राझीलमध्ये ५५ हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याव्यतिरिक्त भारत, रशिया या देशात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.          

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com