नागरिकांना सल्ला देणारे डोनाल्ड ट्रम्प स्वत: मास्क का वापरत नाहीत? जाणून घ्या कारण...

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

अमेरिकेत कोरोना विषाणू महामारीने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वत: मास्कचा वापर का करत नाहीत, असा प्रश्व उपस्थित केला जात आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत कोरोना विषाणू महामारीने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वत: मास्कचा वापर का करत नाहीत, असा प्रश्व उपस्थित केला जात आहे. यावर अमेरिकेचे आरोग्य आणि मानवी सेवा सचिव अॅलेक्स अझर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत परिस्थिती वेगळी असल्याचं ते म्हणाले आहेत.  

‘जी७’ समूहात या देशाचा समावेश करण्यास जपानने दर्शविला विरोध
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच शारीरिक अंतर राखून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अध्यक्ष ट्रम्प हे सर्व नियम स्वत: पाळताना दिसत नाहीत. आतापर्यंतच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा विना मास्क वावर राहिला आहे. त्यामुळे दुसऱ्याला सांगण्याआधी ट्रम्प यांनी या नियमांचे पालन स्वत: का करु नये? असा प्रश्व उपस्थित केला जात होता. 

अॅलेक्स अझर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांना त्यांच्याच प्रशासनाने काढलेले नियम पाळण्याची आवश्यकता नाही. कारण, स्वतंत्र राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची दररोज कोविड-19 चाचणी घेतली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा त्यांची परिस्थिती फार वेगळी आहे, असं ते म्हणाले आहेत. तसेच लोकांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायला हवी. लोकांनी शारीरिक अंतराचं पालन करत नियमित मास्क वापरायला हवा, असंही ते म्हणाले आहेत. 

'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
मास्क घालण्यासंबंधी तुम्ही ट्रम्प यांना कधी सूचवलं आहे का? असा खोचक प्रश्न पत्रकारांनी आरोग्य आणि मानवी सेवा सचिव अॅलेक्स अझर यांना यावेळी विचारला होता. यावर त्यांनी सोयिस्करपणे उत्तर देणे टाळले. मात्र, नागरिकांनी आता स्वत:च स्वत:चे रक्षक व्हायला हवं, असं म्हणायला ते विसरले नाहीत. 

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 लाखांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत कोरोना विषाणूने 1 लाख 28 हजार जणांचा बळी घेतला आहे. अमेरिका कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. महामारी रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी ते अपूरे ठरत असल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why do not Donald Trump himself wear a mask