चीनने सर्वात आधी लसीचा विकास केल्यास अमेरिका मदत घेणार का? ट्रम्प म्हणतात

कार्तिक पुजारी
Wednesday, 22 July 2020

कोरोना विषाणूवरील लस तयार करणाऱ्या कुणासोबतही आम्ही काम करण्यास तयार आहोत, मग तो चीन का असेना, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

वॉशिंग्टन- कोरोना विषाणूवरील लस तयार करणाऱ्या कुणासोबतही आम्ही काम करण्यास तयार आहोत, मग तो चीन का असेना, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ते व्हाईट हाऊस येथे माध्यमांशी संवाद साधत होते. यापूर्वी त्यांनी चीनने कोरोना विषाणू जगभर पसरवला म्हणत टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे.

भूतानसोबत आमची सीमा निश्चिती झाली नाही; चीनची नवी आगळीक
चीनने सर्वात आधी कोरोना विषाणूवरील लस विकसीत केल्यास अमेरिका मदत घेईल का? अशा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, जो कोरोना विषाणूबाबत चांगले निकाल देईल त्या प्रत्येकासोबत काम करण्याची आमची इच्छा आहे. चीनसोबतही आम्ही काम करण्यास तयार आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशातील कोरोना लसीच्या प्रगतीविषयी माहिती दिली. आपण लस निर्मितीचे कार्य वेगाने करत असून यातून मोठे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला चांगली बातमी मिळेल, असं ते म्हणाले. कोरोना विषाणूवरील प्रभावी लस आपल्याला वाटलं होतं, त्यापेक्षा अधिक लवकर मिळणार आहे. शिवाय लसीची उपलब्धतता तात्काळ करण्यात येईल. यासाठी अमेरिकी लष्कर मदत करेल, असंही ट्रम्प म्हणाले.

कोरोना महामारीचा उद्रेक सर्वात आधी चीनमध्ये झाला होता. चीनच्या वुहान शहरातून हा विषाणू जगभरात पसरला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार चीनवर आगपाखड केली आहे. विषाणूच्या प्रसाराला चीन कारणीभूत आहे. चीन या विषाणूला रोखू शकला असता, पण त्याने असे केले नाही. त्यामुळेच आज जगभरात लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. चीनने सुरुवातीच्या काळात विषाणूबाबतची माहिती दडवून ठेवली नसती, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती.

चीनने कोरोना विषाणूवरील संशोधन चोरले; अमेरिकेचा गंभीर आरोप
दरम्यान, जगभरात आतापर्यंत १.४ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेला कोरोना विषाणूने सर्वाधिक पछाडले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४० लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १ लाख ४३ हजार अमेरिकी नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. शिवाय अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. दररोज देशात ६० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था या विषाणूमुळे पूर्णपणे थांबली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will US Work With China If It Develops Vaccine First donald Trumps Response