Recession : जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

world headed recession warning from CEBR Britain financial crisis London

Recession : जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने

लंडन : महागाईचा सामना करण्याच्या उद्देशाने केल्या जात असलेल्या व्याजदरवाढीमुळे सगळे जग मंदीच्या दिशेने वाटचाल करत असून, पुढील वर्षी २०२३ मध्ये अनेक अर्थव्यवस्थांना तीव्र मंदीचा सामना करावा लागेल, असा इशारा ब्रिटनमधील सल्लागार संस्था ‘सीईबीआर’ अर्थात सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने दिला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेने २०२२ मध्ये प्रथमच १०० लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला, परंतु धोरणकर्त्यांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरवाढीचे सत्र सुरू ठेवल्याने २०२३ मध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसेल, असे या संस्थेने त्यांच्या वार्षिक ‘वर्ल्ड इकॉनॉमिक लीग’ अहवालात म्हटले आहे.

महागाईवर मात करण्यासाठी मध्यवर्ती बँका २०२३ मध्येदेखील व्याजदरवाढीवरच भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात वाढीचा वेग कमकुवत राहील, असे या अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अंदाजापेक्षा या संस्थेचे निष्कर्ष अधिक निराशादायी आहेत. ऑक्टोबरमध्येच या संस्थेने एक तृतीयांशपेक्षा जास्त जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग कमी होईल आणि २०२३ मध्ये जागतिक सकल उत्पन्नाचा वेग दोन टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा इशारा दिला होता.

असे असले तरी, विकसनशील अर्थव्यवस्था श्रीमंत अर्थव्यवस्थांच्या बरोबरीत आल्याने २०३७ पर्यंत जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नात दुप्पट वाढ होईल, असेही ‘सीईबीआर’च्या अहवालात म्हटले आहे. यामुळे पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्राचा जागतिक उत्पादनातील हिस्सा एक तृतीयांशपेक्षा जास्त होईल, तर युरोपचा हिस्सा पाचव्या भागापेक्षा कमी होईल. तसेच चीन २०३६ पर्यंततरी जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून अमेरिकेला मागे टाकू शकणार नाही. अपेक्षित कालावधीपेक्षा सहा वर्ष हे उद्दीष्ट पुढे गेले आहे. चीनचे शून्य कोविड धोरण आणि पश्चिमेकडील देशांशी व्यापारातील तणाव यामुळे चीनच्या वाढीचा वेग कमी झाला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘‘चीन आणि पाश्चिमात्य देशांमधील आर्थिक तणावाचे परिणाम युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यापेक्षाही कितीतरी पट अधिक गंभीर आहेत. त्यामुळे जागतिक मंदी आणि महागाईला चालनाच मिळणार आहे, परंतु चीनचे नुकसान अनेक पटींनी जास्त असेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नांना चांगलाच धक्का देईल,’’ असे ‘सीईबीआर’ने म्हटले आहे.

‘सीईबीआर’ने केलेली भाकीते

  • भारत २०३२ पर्यंत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल.

  • तर २०३५ मध्ये भारत १० लाख कोटी डॉलरची तिसरी अर्थव्यवस्था बनेल.

  • पुढील १५ वर्षांमध्ये ब्रिटन जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था राहील.

  • फ्रान्स सातव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असेल

  • अद्याप जागतिक अर्थव्यवस्था दरडोई ८०,००० डॉलर उत्पन्न पातळीपासून खूप दूर आहे.

  • जागतिक तापमानवाढ फक्त १.५ अंशांवर मर्यादित ठेवण्यासाठी आणखी धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहेत.

महागाईविरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही. महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढ केली जात असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला पुढील वर्षी मंदीचा सामना करावा लागेल.

- के. डॅनियल न्यूफेल्ड, संचालक ‘सीईबीआर’.