जगभरातील माध्यमांकडून गंभीर दखल; चीनचा शांततेचा सल्ला 

Balakot
Balakot

भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्याची गंभीर आणि ठळक दखल जगभरातील माध्यमांनी घेतली. त्यात तटस्थ राहण्याचा अनेकांचा प्रयत्न दिसला; मात्र जागतिक समीकरणांनुसार त्या तटस्थतेचे पारडेही कुठेकुठे झुकलेले दिसले... 

अजूनही तहाची शक्‍यता 
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाच दशकांत पहिल्यांदाच देशाची सीमा पार केली, याकडे न्यूयॉर्क टाइम्सने लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांचा कल युद्ध टाळण्याकडेच असू शकेल, असे म्हटले आहे. भारत काश्‍मीरमधील हल्ल्याचा बदला घेत असल्याचे सांगत आहे, तर पाकने फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे परिस्थिती शांत होऊ शकते; मात्र आता प्रतिष्ठेसाठी पाक प्रत्युत्तर देऊ शकेल. त्यास भारत कसा सामोरा जाईल, यावरच सगळे अवलंबून आहे, असे संरक्षणतज्ज्ञांचे मतही दिले आहे. 

जपान भारताच्या बाजूस 
असाई शिबून या जपानमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरील बातमी भारताच्या बाजूने कलल्याचे दिसते. 14 फेब्रुवारीस काश्‍मीरमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या संघटनेच्या तळावर भारताने हा हल्ला केल्याचेही त्यात आवर्जून नमूद केलेले आहे. 

चीन पाककडे झुकलेलाच 
झिन्हुआ या चीनमधील अधिकृत वृत्तसंस्थेने भारताच्या पाकिस्तानातील दहशतवादी कारवाईबाबत पाकिस्तानच्या भूमिकेस प्राधान्य दिले आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांना परत पाठवले यास जास्त महत्त्व देताना, या हल्ल्यात कोणतेही नुकसान न झाल्याचे पाकचे वक्तव्यही नमूद करण्यात आले आहे. 18 परिच्छेदांच्या बातमीत त्यांनी पाकिस्तानच्या सर्व भूमिकेचा सातत्याने उल्लेख केला आहे. त्याच वेळी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचेही वक्तव्य देण्यात आले आहे; तसेच भारताने हे ऑपरेशन यशस्वी झाले हे सांगितल्याचा उल्लेख बातमीतील शेवटच्या वाक्‍यात आहे. 

पाकिस्तानातून.... 
द डॉन : भारतीय हवाई दलाने नियंत्रणरेषेचे उल्लंघन केले असून, पाकिस्तान हवाई दलाच्या चोख प्रत्युत्तरानंतर भारतीय विमानांनी माघार घेतली असल्याचा दावा पाकिस्तानी आर्म फोर्सेसचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केल्याच्या बातमीला डॉनने ठळक प्रसिद्धी दिली आहे. 

दि टेलिग्राफ : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याची संतुलित बातमी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी केलेले दावे-प्रतिदावे त्यांनी आपल्या बातमीत मांडले आहे. या बातमीत त्यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केलेल्या निवेदनाचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर बीबीसी उर्दूने हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींच्या घेतलेल्या प्रतिक्रियांचाही समावेश केला आहे. 

चीनचा शांततेचा सल्ला 
बीजिंग : बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असताना चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी शांतता राखण्याची आवश्‍यकता असल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच, भारताने दहशतवादाविरोधातील लढाई आंतरराष्ट्रीय सहकार्याने लढावी, असे आवाहनही चीनने केले आहे. "आजच्या घटनेची दखल आम्ही घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगत द्विपक्षीय संबंध सुधारण्याकडे अधिक लक्ष द्यावे,' असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी केले. 

ऑस्ट्रेलियाचा पाकला सल्ला 
दहशतवादी कारवायांसाठी आपल्या भूमीचा वापर करू देणे पाकिस्तानला आता शक्‍य होणार नाही. त्यांनी आता जैशे महंमदसह इतर सर्व दहशतवादी संघटनांवर तातडीने कारवाई करावी, असा सल्ला ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला आहे. तसेच, आजच्या हवाई हल्ल्यांनंतर तणाव न वाढवता भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा, असे आवाहनही ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिस पेनी यांनी केले आहे. 

भारताने संयम पाळावा युरोपीय महासंघाचे आवाहन 
भारताने मंगळवारी (ता. 26) पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर जागतिक समूहाने चिंता व्यक्त केली आहे. "भारताने जास्तीत जास्त संयम पाळावा,' असे आवाहन युरोपीय महासंघाने केले आहे. 

भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, तुर्कस्तान आणि अन्य सहा "आसिआन' (आग्नेय आशियाई देशांची संघटना) देशांना बालाकोट येथील लक्ष्यभेदी हवाई हल्ल्याबाबत माहिती दिली. भारतात पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती दहशतवादी बॉंबहल्ल्याची जबाबदारी घेणारी जैशे महंमद तसेच लष्करे तैयबा आणि अन्य दहशतवादी गटांच्या विरोधात पाकिस्तानने तातडीने आणि ठोस कारवाई करावी, असे आवाहन ऑस्ट्रेलिया सरकारने केले. पाकिस्तानने स्वत:च जैशे महंमदवर घातलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. दहशतवादी संघटनांना देशाच्या भूमीवरून कारवाया करण्यासाठी कायदेशीर आणि भौतिक जागांचा वापर करण्याची मुभा देऊ नये, अशी सूचना ऑस्ट्रेलिया सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पाकिस्तानला केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही संयम पाळावा, असे आवाहनही ऑस्ट्रेलियाने केले आहे. 

"सलोखा, सहकार्य हिताचे' 
या कसोटीच्या काळात भारताने संयम पाळावा, असे आवाहन चीननेही केले आहे. चीनने संबंधित वृत्तांची नोंद घेतली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी बीजिंग येथे प्रसारमाध्यमांना सांगितले. भारत आणि पाकिस्तान या दक्षिण आशियातील महत्त्वाच्या देशांत सलोखा आणि सहकार्याचे संबंध असणे दोघांच्या हिताचे आणि या भागात शांतता व स्थैर्य टिकवण्यासाठी अत्यावश्‍यक आहे, असे ते म्हणाले. हे दोन्ही देश संयम पाळतील आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com